Join us  

शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 6:11 PM

3 जून रोजी शेअर बाजारातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी गेल्या दोन दिवसांत शेअर बाजारातून लाखो रुपयांची कमाई केली आहे.

Share Market News : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलपूर्वी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामण यांनी शेअर बाजाराबाबत केलेले भाकित अन् त्यानंतर 4 जून रोजी कोसळलेला शेअर बाजार, यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वात मोठ्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. तसेच, याप्रकरणी जेपीसी मागणीदेखील केली आहे. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार, घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनीदेखील 3 जून रोजी शेअर बाजारातून बक्कळ कमाई केली आहे.

नेमकं प्रकरण काय?लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा 1 जून रोजी संपला आणि त्याच दिवशी एक्झि पोल समोर आले. त्यात भाजपला 350-370 जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी वाढ झाली आणि सेन्सेक्सने सर्वकालीन उच्चांक गाठला. पण, त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले अन् भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठला आला नाही. त्यामुळे शेअर बाजार कोसळला आणि गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले.  या घसरणीवरुन राहुल गांधी यांनी थेट भाजपवर टीका केली असून, याला शेअर बाजारातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. तसेच, याची चौकशी करण्याची मागणीदेखील केली आहे.

त्या लाटेत राहुल यांचाही फायदामीडिया रिपोर्ट्सनुसार, 3 जूनची घटना शेअर बाजारातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून आरोप करणाऱ्या राहुल गांधींच्या पोर्टफोलिओवर नजर टाकली, तर त्यांनी डझनभर शेअर्समध्ये पैसेही गुंतवल्याचे दिसेल. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओमध्ये एशियन पेंट्सपासून ते पिडीलाइटपर्यंतचे शेअर्स आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने राहुल गांधींचेही नुकसान झाले. मात्र, 6 जूनपर्यंत त्यांचे सर्व गेलेले पैसे वसूल झाले आहे. राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमधील प्रमुख होल्डिंग्समध्ये इन्फोसिस, LTIMindtree, TCS, ITC, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि पिडिलाइट इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. 

राहुल गांधींनी 5 जून रोजी 13.9 लाख रुपये कमावले राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये सोमवार, 3 जून रोजी 3.45 लाख रुपयांची वाढ झाली, मात्र दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर 4.08 लाख रुपयांचे नुकसानही झाले. पण, त्यानंतर देशात एनडीए सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आणि बाजाराने पुन्हा मुसंडी मारली. बाजारातील या सततच्या तेजीमुळे राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये चांगली वाढ झाली. यामुळे 5 जून रोजी राहुल यांना 13.9 लाख रुपयांचा नफा झाला, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी 1.78 लाख रुपये कमावले.

शेअर बाजार पुन्हा वधारलाकेंद्रात NDA सरकारची वापसी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात वादळी वाढ झाली. 30 शेअर्सच्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) सेन्सेक्सने नवा सार्वकालिक उच्चांक गाठला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (NIFTI) देखील रॉकेटच्या वेगाने वर गेला. दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स 1618 अंकांच्या वाढीसह 76,693 च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 468 अंकांच्या वाढीसह 23,290 च्या पातळीवर बंद झाला.

मार्केट कॅप 7.51 लाख कोटींनी वाढलेआजच्या सत्रात भारतीय शेअर बाजारातील जोरदार उसळीमुळे सलग तिसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 423.40 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील सत्रात 415.89 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 7.51 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

(टीप- शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारराहुल गांधीमतदानोत्जतर जनमत चाचणीभाजपालोकसभा निवडणूक टफ फाइट्स