Adani Group Share: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. अदानी समूहातील सर्वच कंपन्यांचे शेअर रॉकेट स्पीडने वाढताना दिसत आहेत. अनेक कंपन्यांच्या शेअरना अप्पर सर्किट लागल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अदानी समूहाला क्लीन चिट दिली. यातच एका माणसाचे नशीब जोरदार फळफळले आहे. अदानी समूहाच्या पडत्या काळात कंपनीची मदत करणाऱ्या व्यक्तीने १०१ दिवसांत तब्बल ८ हजार ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हिंडेनबर्ग संस्थेने अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहाला प्रचंड मोठे नुकसान झाले. सर्वच कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात कोसळले. मात्र, या संकटकाळात गुंतवणूक फर्म GQG Partners चे सहसंस्थापक राजीव जैन यांनी अदानी ग्रुपमध्ये गुंतवणुकीचा मोठा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडल्याचे पाहायला मिळत आहे. संकटात संधी शोधून संधीचे सोने केले. अदानी समूहातील गुंतवणुकीतून केवळ १०१ दिवसांत जवळपास ८ हजार ५०० कोटींचा फायदा झाला.
राजीव जैन यांचा अदानी समूहात १० टक्क्यांनी गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय
दिग्गज गुंतवणूकदार राजीव जैन यांची कंपनी GQG Partners LLC ने अदानी समूहातील आपला हिस्सा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी अदानी समूहातील आपला हिस्सा १० टक्क्यांनी वाढवत आहे. ही फर्म अदानी समूहाच्या भविष्यातील निधी उभारणीच्या योजनांमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांमधील GQG भागीदारांचे मूल्य सुमारे ३.५ अब्ज होते. मार्च महिन्यात, GQG ने अदानी समूहाच्या ४ कंपन्यांमध्ये सुमारे १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीचे मूल्य आता १०,०६९ कोटी रुपयांनी वाढून २५,५१५ कोटी रुपये झाले आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाल्याने राजीव जैन यांना तगडा नफा झाला आहे.
दरम्यान, अदानी विल्मर, अंबुजा सिमेंट, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅसमध्ये ५ टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. सलग दुसऱ्या दिवशी अदानी समूहाच्या शेअर्सना अप्पर सर्किट लागले. एनडीटीव्ही आणि एसीसी सिमेंटमध्ये तेजी दिसून आली.