शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांचे अकस्मात निधन झाले आहे. यामुळे तीन दिवसांपासून बंद असलेल्या शेअर बाजारावर आज उघडताच मोठा परिणाम दिसून आला आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ज्या ज्या कंपन्यांचे शेअर होते, ते गडगडायला सुरुवात झाली आहे.
एक काळ असता होता, झुनझुनवालांनी एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले रे केले की ते झपाट्याने वधारू लागत होते. अनेकजण तर झुनझुनवाला कोणता शेअर खरेदी करतात याकडेच लक्ष ठेवून असायचे. ते शेअर घ्यायचे आणि पैसे कमवायचे. आता झुनझुनवालांचे निधन झाल्यावर त्यांनी घेतलेल्या शेअर्स कंपन्यांचे काय होणार असा प्रश्न अनेकांना उपस्थित होत होता. आज त्याचे उत्तर मिळाल्यात जमा आहे.
अॅपटेक लिमिटेडचा शेअर सर्वाधिक गडगडला आहे. सकाळपासून या शेअरमध्ये ५ टक्के घसरण झाली आहे. स्टार हेल्थच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे. झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण ३२ कंपन्यांचे शेअर्स होते. त्यापैकी टाटाच्या टायटन कंपनीत सर्वाधिक गुंतवणूक होती. त्या टायटन कंपनीच्या शेअरमध्येही आज 1.54 टक्क्यांची घसरण झाली आहे. बीएसई सेन्सेक्सवर टायटनचा शेअर 2,433 रुपयांवर आला होता.
जून तिमाहीच्या शेवटी, झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांच्याकडे टायटनमधील 5.10 टक्के समभागांसह 11,086.9 कोटी रुपयांचे शेअर्स होते. 12 ऑगस्ट रोजी टायटनचा शेअर 0.01 टक्क्यांनी वाढून 2.19 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह 2,471.95 रुपयांवर बंद झाला होता.
राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा यांच्याकडे भारतातील मल्टी-ब्रँड फुटवेअर रिटेल चेनमध्ये 3,348.8 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. Aptech Ltd चे समभाग आज बीएसईवर 3.67 टक्क्यांनी घसरून 224.20 रुपयांवर व्यवहार करत होते. राकेश झुनझुनवाला हे स्टार हेल्थचे प्रवर्तक होते. 12 ऑगस्ट रोजी शेअर 0.40 टक्क्यांनी वाढून 696.10 रुपयांवर बंद झाला होता. तो आज 660 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. क्रिसिल लिमिटेडमध्येही बिग बुलची 1,301.9 कोटी रुपयांची हिस्सेदारी होती. त्यामध्येही घसरण झाली आहे.