Join us

झुनझुनवाला म्हणत, पैसा कमवाच, पण ते सर्वस्व नव्हे; त्यांच्याकडून शिकावेत असे काही धडे...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 7:26 AM

तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि भविष्यवेधी अचूक विश्लेषणाची ताकद असणारे राकेश झुनझुनवाला.

- मनोज गडनीस

तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर घडामोडींचे भविष्यवेधी अचूक विश्लेषण करत हजारो कोटी रुपयांची संपत्ती (मालमत्ता नव्हे) निर्माण करणारे राकेश झुनझुनवाला. त्यांच्या निधनामुळे आपण पैशांचे भविष्यवेधी मॅट्रिक्स मांडून सोडविणारी व्यक्ती गमावली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत असलेली ताकद, बाजारपेठीय शक्तींमध्ये लपलेले मूल्य आणि त्या मूल्यांत भारतीयांना श्रीमंत करण्याची दडलेली शक्ती, या मुद्द्यांच्या अनुषंगाने राकेश झुनझुनवाला यांच्या कारकिर्दीकडे पाहिले तर अर्थकारण, पैसा आणि श्रीमंती यांचे नवे समीकरण उमजू शकेल. त्यांच्याकडून जरुर शिकावे, आचरणात आणावे, असे काही धडे. त्यांची जीवनशैली, पैशाकडे पाहण्याची नजर आणि तत्वज्ञान याविषयी झुनझुनवालांनी विविध मुलाखतीतून तपशीलवार उत्तरं दिली होती. त्यापैकीच या काही निवडक गोष्टी...

हेल्थ इज वेल्थ

माझेच उदाहरण घ्या. मला मद्यपान, धुम्रपान करायला आवडते. मी अत्यंत आळशी आहे. मला व्यायाम आवडत नाही. गेली २५ वर्षे मी रात्रंदिवस झपाट्याने काम केले. पण, माझ्याकडे असलेला वेळ मर्यादीतच आहे. पैशामुळे कोट्यवधी चांगल्या गोष्टी तुम्हाला सहज मिळतील. पण मृत्यूनंतर तुम्हाला काहीच सोबत नेता येत नाही. त्यामुळे निरोगी आयुष्य हाच एक महत्त्वाचा घटक आहे. तो दुर्लक्षित करण्यासारखा नाही. 

पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे...

पैसा हे व्यवहाराचे साधन आहे. काही लोकांचे पैशांवर प्रेम असते. काही लोक त्यासाठी मरतात, काही लोक त्याचा सुयोग्य वापर करतात. काही उधळतात, बरेच लोक त्यासाठी लढतात, पण बहुसंख्य लोक तो मिळविण्याची ईर्ष्या बाळगून असतात. पैसा म्हणजे संपत्ती, पैसा म्हणजे पॉवर. अनेकवेळा विचार करताना मला जाणवते, की लोकांना वाटते त्यापेक्षा खूप कमी पैसा माझ्याकडे आहे. पण माझ्या गरजांचा विचार करता कित्येक पट अधिक पैसा माझ्याकडे आहे. संपत्ती हेदेखील आयुष्याचे उद्दिष्ट असू शकते. पण, एवढा पैसा कमावल्यानंतर माझ्या लक्षात आले आहे की, पैसा हे कटू वास्तव आहे, पण तो कमावणे म्हणजेच यशाचा कळस गाठणे नव्हे. 

बाजारपेठ नावाची प्रचंड शक्ती

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अफाट शक्ती दडलेली आहे. याचे मूल्य ओळखता यायला हवे. १९८५ साली जेव्हा  शेअर बाजारात गुंतवणुकीस सुरुवात केली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स १५० अंकावर होता. आता तो सेन्सेक्स ६० हजार अंकांवर आला, जर देशामध्ये प्रगतीच झाली नसती तर त्याचे पडसाद शेअर बाजाराच्या कामगिरीवर उमटले नसते, अन्  तसे झाले नसते तर मी तरी कसा श्रीमंत झालो असतो? जागतिकीकरणानंतर माझी कारकीर्द बहरली. बाजारपेठ म्हणून आपल्या देशात असलेली शक्ती ही प्रचंड मोठी आहे. त्याचा सखोल विचार व्हायलाच हवा. अधिक जोखीम अधिक परतावा, हे बाजाराचे सूत्र आहे. पण मी एवढेच सांगतो की, जेवढी क्षमता आहे तेवढीच जोखीम घ्या. क्षमतेपेक्षा जास्त जोखीम घेतल्यास सर्वस्व गमावले जाऊ शकते.

वडील म्हणाले, पाय जमिनीवर ठेव!

मी मध्यमवर्गीय घरात जन्मलो. मध्यमवर्गीय संस्कारांची माझी नाळ तुटणार नाही, याची दक्षता वडिलांनी नेहमी घेतली. वडील माझ्या घरी राहिले नाहीत तर मी त्यांच्या घरी राहात होतो. जेव्हा माझ्याकडे खूप पैसे आले तेव्हा वडील म्हणाले की, तू किती कमावतोस हे महत्त्वाचे नाही. पण त्यातील किती पैशांची देणगी देतो, समाजोपयोगी कामे करतोस हे जास्त महत्त्वाचे आहे. नवा पैसा आहे हा, नव्या पैशांचा उन्मादही तेवढाच असतो, हे तू कधी विसरू नको. तुझ्या घरी कुणीही पैशांसाठी आले तर १०० दे किंवा एक लाख रुपये त्याला दे, पण कधी रिकाम्या हाताने त्या व्यक्तिला परत पाठवू नको.

‘दान’ आणि ‘देणे’, या दोन गोष्टींचे भान त्यांनी मला दिले. फोर्ब्सच्या यादीत जेव्हा माझे नाव आले तेव्हा तर त्यांनी मला खडसावले होते, तुझ्याकडे जरी अब्जावधी डॉलर्स असतील आणि तर तू काहीच चॅरिटी करत नसशील तर याची तू शरम बाळग. माझे पाय जमिनीवर ठेवण्याचे काम त्यांनी नेहमी केले. माझ्यासाठी हा कायमच महत्त्वाचा धडा राहील. लहानपणी माझ्या मित्रांत अनेक श्रीमंत घरातील मुले होती. पण मला वडिलांनी शिकवले, तू महत्त्वाकांक्षा ठेव. पण मत्सर ठेवू नकोस. मनात मत्सर आला की, राग उत्पन्न होतो, त्यातून भांडणे होतात. अमूल्य नाती दुरावतात.

टॅग्स :राकेश झुनझुनवालाशेअर बाजार