केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून टायटन लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. २ फेब्रुवारी २०२३ रोजी सुमारे २,३१० रुपयांच्या पातळीवर बंद झाल्यानंतर, टायटन शेअरची किंमत गेल्या दोन आठवड्यांपासून तेजीत आहे. सध्या टाटा समूहाचा हा शेअर २,३१० रुपयांवरून २,५३५ रुपये प्रति शेअर झाला आहे. त्यामुळे राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी एक हजार कोटींची कमाई केली आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या तिमाहीतील टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ४,५८,९५,९७० शेअर्स आहेत, जे टायटन कंपनी लिमिटेडच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या ५.१७ टक्के इतके आहे. आज टायटनच्या शेअरची किंमत सुमारे २,५३५ रुपये आहे. गेल्या दोन आठवड्यांतील २,३१० रुपयांच्या पातळीवरून तो आज २,५३५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे, याचा अर्थ या काळात कंपनीच्या शेअरमध्ये २२५ रुपयांची वाढ झाली आहे.
बीएसई वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार टायटन कंपनी लिमिटेडमधील रेखा झुनझुनवाला यांच्या शेअरहोल्डिंगचा विचार करता, गेल्या दोन आठवड्यांत टायटनच्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या एकूण मूल्यात अंदाजे १०,३२,६५,९३,२५० रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ जवळपास १,००० कोटींपेक्षा जास्त आहे.
रेखा झुनझुनवाला यांची निव्वळ संपत्ती गेल्या दोन आठवड्यात आणखी वाढू शकली असती जर त्यांनी टाटा समूहाच्या या कंपनीतील हिस्सा कमी केला नसता. जुलै ते सप्टेंबर २०२२ या तिमाहीसाठी टायटन कंपनी लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे १,५०,२३,५७५ टायटनचे शेअर्स किंवा १.६९ टक्के हिस्सा आहे. दिवंगत पती राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे ३,४१,७७,३९५ शेअर्स किंवा कंपनीत ३.८५ टक्के हिस्सा होता. तर, झुनझुनवाला दाम्पत्याकडे टायटनचे एकूण मिळून ४,९२,००,९७० शेअर्स होते, जे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या ५.५४ टक्के होते.
कंपनीच्या Q3FY23 शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे ४,५८,९५,९७० टायटनचे शेअर्स किंवा ५.१७ टक्के हिस्सा आहे. याचा अर्थ, रेखा झुनझुनवाला यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या तिमाहीत टायटन कंपनीचे ३३,०५,००० शेअर्स किंवा कंपनीतील ०.३७ टक्के शेअर्स विकून या टाटा ग्रुप कंपनीतील हिस्सेदारी कमी केली.