Join us

Ram Mandir : २२ जानेवारीला शेअर बाजार राहणार बंद, आज पूर्ण दिवस होणार कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 8:57 AM

नव्या परिपत्रकानुसार शनिवारी दिवसभर शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार आहे आणि २२ जानेवारी रोजी कामकाज पूर्णपणे बंद राहील.

अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपू्र्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या दिवशी आता शेअर बाजारही बंद राहणार आहे. या दिवशी मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) कोणतेही व्यवहार होणार नाहीत. अयोध्येतील राम मंदिरात पार पडणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे २२ जानेवारीला शेअर बाजारात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्याऐवजी आज म्हणजेच शनिवार, २० जानेवारी रोजी शेअर बाजार उघडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, शनिवारी २० जानेवारीला फक्त दोन तास बाजार उघडण्याची योजना होती. मात्र, नव्या परिपत्रकानुसार शनिवारी दिवसभर शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार आहे.अनेक कारणांमुळे शनिवारचं कामकाज वेगळं असेल हे जाणून गुंतवणूकदारांना आनंद होईल, अशी प्रतिक्रिया जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स यांनी दिली.२००० च्या नोटा बदलल्या जाणार नाहीतअयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी म्हणजे २२ जानेवारी रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कार्यालयात २ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची किंवा जमा करण्याची सुविधाही बंद राहणार आहे."केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीमुळे, सोमवार, २२ जानेवारी रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या १९ कार्यालयांपैकी कोणत्याही कार्यालयांमध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची/जमा करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही," असं आरबीआयनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.महाराष्ट्र सरकारनं जाहीर केली सुट्टीमहाराष्ट्र सरकारनंही २२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयं आणि शाळा बंद राहतील, असं सरकारनं म्हटलं. महाराष्ट्र सरकारच्या या घोषणेनंतर २२ जानेवारी रोजी मनी मार्केटमधील व्यवहार बंद राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.महाराष्ट्रापूर्वी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, उत्तराखंड, छत्तीसगड, आसाम, राजस्थान, हरियाणा या राज्य सरकारनं २२ जानेवारी ही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.

टॅग्स :शेअर बाजारराम मंदिरअयोध्या