Join us

टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 3:34 PM

Ratan Tata Titan: टाटा समूहाच्या किमान डझनभर शेअर्सनं गेल्या दोन दशकांत २० पटीहून अधिक परतावा दिला आहे. त्यापैकी एका शेअरची मोठी चर्चा आहे.

Ratan Tata Titan: टाटा समूहाच्या किमान डझनभर शेअर्सनं गेल्या दोन दशकांत २० पटीहून अधिक परतावा दिला आहे. त्यापैकी टायटन कंपनी लिमिटेडच्या शेअर्सची खूप चर्चा आहे. कंपनीच्या शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत कोट्यधीश बनविण्याचं काम केलं आहे. टायटनचा शेअर गुरुवारी व्यवहारादरम्यान १ टक्क्यांहून अधिक वधारला आणि ३५३२.८० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. १५ नोव्हेंबर २००१ रोजी शेअरची किंमत फक्त १ रुपया होती. म्हणजेच तेव्हापासून या शेअरनं ३५३१८०% चा दमदार परतावा दिला आहे. म्हणजेच टाटाच्या या शेअरमध्या ज्यांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती कायम ठेवली त्यांच्या गुंतवणूकीचं मूल्य २३ वर्षांत ३५ कोटी रुपयांपार गेलंय.

राकेश झुनझुनवालांचा आवडता स्टॉक

राकेश झुनझुनवाला यांचा टाटा समूहाच्या शेअर्सवर सर्वाधिक विश्वास होता. याचा उल्लेखही त्यांनी आपल्या मुलाखतीत अनेकदा केला आहे. बीएसईच्या माहितीनुसार झुनझुनवाला कुटुंबाकडे टायटनचे ४७,३११,४७० शेअर्स आहेत. हा हिस्सा ५.३२ टक्के इतका आहे. 

इतर शेअर्सची स्थिती

आज टाटा ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स १४ टक्क्यांपर्यंत वधारले. टाटा केमिकल्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेसचे शेअर्स सर्वाधिक वधारले. टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही. के. विजयकुमार यांनी 'टीसीएस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्झ्युमर आणि इंडियन हॉटेल्स सारखे शेअर्स खरेदी करून गुंतवणूकदार रतन टाटा आणि त्यांनी उभारलेल्या महान कॉर्पोरेट साम्राज्याला श्रद्धांजली अर्पण करू शकतात, अशी प्रतिक्रिया दिली. 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार