Kalyan Jewellers Multibagger Stock: असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मालामाल केलं. तर असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलंय. आज आपण अशा स्टॉकबद्दल बोलणार आहोत, ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलंय. आम्ही सांगत आहोत कल्याण ज्वेलर्सच्या स्टॉकबद्दल. भारतात सोनं खरेदीची क्रेझ आहे. पण सोन्याऐवजी सोन्याचे दागिने विकणाऱ्या कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers Share Price) या कंपनीचे शेअर्स तुम्ही खरेदी केले असते तर कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्सनं तुम्हाला सोन्यावरील गुंतवणुकीपेक्षा कितीतरी पटीने जास्त परतावा दिला असता.
२०२१ मध्ये आलेला IPO
कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ मार्च २०२१ महिन्यात आला होता. कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून ८७ रुपयांच्या इश्यू प्राइसवर पैसे उभे केले होते. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी हा शेअर आयपीओच्या किमतीपेक्षा कमी म्हणजे ७५.२ रुपयांवर बंद झाला आणि त्या पातळीवरून कल्याण ज्वेलर्सच्या शेअरमध्ये १० पटीने वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरनं आता ७८६.२५ रुपयांचा उच्चांक गाठला आहे. ४ डिसेंबर २०२४ रोजी कल्याण ज्वेलर्सचा शेअर ७२३ रुपयांवर बंद झाला.
जून २०२२ पासून १२ पटींनी वाढ
जून २०२२ मध्ये कल्याण ज्वेलर्सचा शेअर ५५ रुपयांपर्यंत घसरला होता. ज्या गुंतवणूकदारांनी जून २०२२ मध्ये सोन्याऐवजी कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स खरेदी केले असतील तर त्यांच्या गुंतवणूकीचं मूल्य १२ पटीनं वाढलं आहे. जून २०२२ पासून अडीच वर्षांत कल्याण ज्वेलर्सच्या शेअरनं गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
जर तुम्ही जून २०२२ मध्ये कल्याण ज्वेलर्सचे १० लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते तर तुमची गुंतवणूक १.३० कोटी रुपये झाली असती. जून २०२२ मध्ये जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर त्याची किंमत तेव्हा ५१००० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी होती. जर तुम्ही २०० ग्रॅम सोनं १० लाख रुपयांना खरेदी केलं असतं तर आज त्याची किंमत १५.२० लाख रुपये असती.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)