Join us

Raymond च्या 'या' शेअरची बाजारात धमाकेदार एन्ट्री; ९९ टक्क्यांपेक्षा अधिक फायद्यासह लिस्टिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 12:24 PM

रेमंड ग्रुपच्या (Raymond Group) एका कंपनीनं शेअर बाजारात धमाका केला आहे. कंपनीचा शेअर मुंबई शेअर बाजारात ९९.५ टक्के प्रीमियमसह ३,००० रुपयांवर लिस्ट झाला.

रेमंड ग्रुपची (Raymond Group) कंपनी रेमंड लाइफस्टाइलनं (Raymond Lifestyle) शेअर बाजारात धमाका केला आहे. रेमंड लाइफस्टाइलचा शेअर मुंबई शेअर बाजारात ९९.५ टक्के प्रीमियमसह ३,००० रुपयांवर लिस्ट झाला. बीएसईवर कंपनीच्या शेअर्सची बेस प्राइस १५०३.३ रुपये प्रति शेअर होती. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (एनएसई) रेमंड लाइफस्टाइलचा शेअर ९३ टक्के प्रीमियमसह ३०२० रुपयांवर लिस्ट झाला. एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची बेस प्राइस १५६२.६ रुपये होती.

रेमंडच्या ५ शेअर्सवर लाईफस्टाईलचे ४ शेअर्स

गौतम सिंघानिया यांच्या रेमंड लिमिटेडनं आपल्या कन्झ्युमर लाईफस्टाईल बिझनेसला वेगळं केलं होतं. डीमर्जरनंतर रेमंड लाईफस्टाईलचे (Raymond Lifestyle) ४ प्रमुख सेगमेंट्स वेडिंग अँड एथनिक वेअर, गारमेंट्स एक्सपोर्ट, ब्रांडेड अपॅरल आणि टेक्सटाईल्स असतील. रेमंड लाईफस्टाईल आपली पेरेंट कंपनी रेमंड लिमिटेडमधून डीमर्ज झाली होती. रेमंड लिमिटेडच्या ५ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या ५ शेअर्सच्या मोबदल्यात रेमंड लाईफस्टाईलचे २ रुपये फेस व्हॅल्यू असलेले ४ शेअर्स देण्यात आले. डीमर्जरनंतर समूहाच्या दोन्ही कंपन्या रेमंड आणि रेमंड लाईफस्टाईल दोन्ही लिस्ट झाल्या आहेत.

तेजीनंतर शेअर आपटले

रेमंड लाइफस्टाइलचे शेअर्स ९० टक्क्यांहून अधिक तेजीसह बीएसई आणि एनएसई दोन्ही एक्स्चेंजवर लिस्ट झाले. दमदार सुरुवातीनंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली. बीएसईवर रेमंड लाइफस्टाइलचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून २,८५० रुपयांवर आला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये रेमंड लाइफस्टाइल ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटसह २८६९ रुपयांवर पोहोचला. कंपनीचं मार्केट कॅप १७,४७८.९९ कोटी रुपयांवर पोहोचलंय. मूळ कंपनी रेमंड लिमिटेडच्या शेअरमध्येही घसरण पाहायला मिळत आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक