Bajaj Finance Share Price: नॉन बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये (Bajaj Finance Share Price) ३ मे रोजी कामकाजादरम्यान ७ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. रिझर्व्ह बँकेनं बजाज फायनान्सच्या ईकॉम आणि ऑनलाइन डिजिटल 'इन्स्टा ईएमआय कार्ड' या दोन उत्पादनांवरील स्थगिती तात्काळ उठवली आहे. त्यामुळे शेअरबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून शेअरची खरेदी वाढली. बजाज फायनान्सचा शेअर सकाळी बीएसईवर तेजीसह ७३५० रुपयांवर उघडला. काही वेळातच तो मागील बंद किमतीच्या तुलनेत ७.५ टक्क्यांनी वधारला आणि ७४०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
रिझर्व्ह बँकेने निर्बंध उठवल्यानंतर आता ईएमआय कार्ड जारी करण्यासह ईकॉम आणि ऑनलाइन डिजिटल 'इन्स्टा ईएमआय कार्ड' व्यवसाय विभागात कर्ज मंजुरी आणि वितरण पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती बजाज फायनान्सनं २ मे रोजी शेअर बाजारांना दिली.
आरबीआयनं घातलेले निर्बंध
आरबीआयनं १५ नोव्हेंबर २०२३ रोजी बजाज फायनान्सला ईकॉम आणि इन्स्टा ईएमआय कार्डअंतर्गत कर्ज मंजूर करणं आणि वितरण थांबविण्यास सांगितलं होतं. यानंतर कंपनीने ग्राहकांना एक्झिस्टिंग मेंबर आयडेंटिफिकेशन (ईएमआय) कार्ड देणं तात्पुरतं बंद केलं. आरबीआयच्या डिजिटल कर्ज मार्गदर्शक तत्त्वांच्या विद्यमान तरतुदींचे पालन न करणं, विशेषत: या दोन कर्ज उत्पादनांअंतर्गत कर्जदारांना फॅक्ट्स स्टेटमेंट जारी न करणं आणि कंपनीकडून मंजूर केलेल्या इतर डिजिटल कर्जाच्या बाबतीत जारी केलेल्या फॅक्ट स्टेटमेंट्समधील त्रुटींमुळे आरबीआयनं ही कारवाई केली होती.
रिझर्व्ह बँकेनं ईकॉम आणि 'इन्स्टा ईएमआय कार्ड'वर निर्बंध लादल्यानंतर, त्यात आवश्यक ते बदल करण्यात आल्याची माहिती बजाज फायनान्सनं २५ एप्रिल रोजी जानेवारी-मार्च २०२४ चे आर्थिक निकाल जाहीर करताना दिली. त्याचबरोबर कंपनीनं रिझर्व्ह बँकेला व्यावसायिक निर्बंधांचा आढावा घेण्याची विनंती केली होती.
ब्रोकरेजनं काय म्हटलं?
रिझर्व्ह बँकेनं बंदी उठवल्यानंतर जेफरीजनं बजाज फायनान्सच्या शेअरला 'बाय' रेटिंग दिलं असून त्याचं टार्गेट प्राइस ९,२६० रुपये प्रति शेअर केलं आहे. २ मे रोजी बीएसईवर शेअरच्या बंद किमतीपेक्षा हे ३४.५ टक्क्यांनी अधिक आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बजाज फायनान्सचा व्यवसाय आणि वाढ सुधारू शकते, असं ब्रोकरेजचं म्हणणे आहे. सिटीनं शेअरवर 'बाय' रेटिंग कायम ठेवलं असून प्रति शेअर ८,६७५ रुपये टार्गेट निश्चित करण्यात आलंय. Emkay च्या विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार बंदी उठविल्यामुळे कंपनीला अधिक ग्राहक जोडता येतील आणि शुल्कातून चांगलं उत्पन्न मिळेल. ब्रोकरेज कंपनीनं शेअरला बाय रेटिंग दिलं असून ९ हजार रुपयांचं टार्गेट प्राईज दिलंय.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)