Join us

शेअर बाजाराची पडझड रोखण्यास RBI धावली, या आठवड्यात काय? गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी बुडाले

By प्रसाद गो.जोशी | Published: October 03, 2022 10:35 AM

आगामी सप्ताहात जागतिक वातावरण, वाहन विक्री, पीएमआयची आकडेवारी आणि रुपयाच्या मूल्यावर बाजाराची वाटचाल अवलंबून आहे.

प्रसाद गो. जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क

जवळपास सर्वच मध्यवर्ती बँकांनी वाढविलेले व्याजदर आणि जगभरामध्ये मंदी येण्याची भीती यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण होत असल्याने भारतीय बाजारही खाली-खाली येत होता. शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना व्याजदरामध्ये अपेक्षित असलेली वाढ केली आणि बाजारामध्ये खरेदीदार परतले. त्यामुळे बाजार बराच वाढला असला तरी सप्ताहाचा विचार करता बाजार खालावला. आगामी सप्ताहात जागतिक वातावरण, वाहन विक्री, पीएमआयची आकडेवारी आणि रुपयाच्या मूल्यावर बाजाराची वाटचाल अवलंबून आहे.

सप्टेंबर महिन्यातील वाहन विक्री तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्राची पीएमआय याची आकडेवारी जाहीर झाल्यावर त्याची स्थिती बघून बाजार प्रतिक्रिया देईल. डॉलर-रुपयाच्या विनिमय मूल्याचाही बाजारावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय खनिज तेलाच्या किमती आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांची स्थिती यावरही बाजाराची दिशा ठरू शकेल.

विदेशी गुंतवणूकदारांनी काढले ७६०० कोटी

गेले दोन महिने खरेदीच्या मूडमध्ये असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी अमेरिकेतील व्याजदर वाढण्याच्या वृत्तापासूनच भारतीय बाजारातून पैसे काढून घेण्याचे धोरण अवलंबले आहे. सप्टेंबर महिन्यात या संस्थांनी भारतीय बाजारातून ७६२४ कोटी रुपये काढून घेतले आहेत. चालू कॅलेंडर वर्षामध्ये परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून १.६८ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.

गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी बुडाले

गतसप्ताहामध्ये बाजारात होत असलेल्या घसरणीमुळे भारतीय शेअर बाजाराचे भांडवल कमी झाले असून त्यामुळे गुंतवणूकदारांची ४,७९,९६४.९२ कोटी रुपयांची संपत्ती वाहून गेली आहे. भारतीय शेअर बाजारातील पहिल्या १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे भांडवलमूल्य कमी झाले आहे. या ७ कंपन्यांचे भांडवल १.१६ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. टॉप टेनपैकी टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि इन्फोसिसचे भांडवल गतसप्ताहामध्ये वाढले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशेअर बाजार