Join us

महारत्न कंपनीकडून मिळाली मोठी ऑर्डर; 'या' छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये आली तुफान तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 3:02 PM

शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ७४० रुपयांवर पोहोचला. सरकारी कंपनीकडून मिळालेल्या मोठ्या ऑर्डरनंतर या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.

जेएनके इंडिया या छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात जेएनके इंडियाचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ७४० रुपयांवर पोहोचला. महारत्न कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कडून मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली. जेएनके इंडियाच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ८९५.४० रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५५० रुपये आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एचपीसीएल) मोठी ऑर्डर मिळाल्याचे जेएनके इंडियाने रेग्युलेटरी फाइलिंगद्वारे सांगितले आहे.एचपीसीएल मुंबई रिफायनरीमध्ये एचपी टीडीएई युनिट हा नवीन प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे. या प्रकल्पाची किंमत ५० ते १५० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती कंपनीनं रेग्युलेटरी फायलिंगद्वारे दिली. जेएनके इंडियाचे मार्केट कॅप ४०९० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.२३ एप्रिल २०२४ रोजी कंपनीचा आयपीओ उघडला आणि २५ एप्रिलपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ४१५ रुपये होती.

कंपनीचा आयपीओ एकूण २८.४६ पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ४.२० पट सब्सक्राइब झाला होता. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सच्या (NII) श्रेणीत २३.८० पट, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (QIB) कोटा ७४.४० पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोलू लावू शकणार होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये ३६ शेअर्स होते.

काय करते कंपनी?

जेएनके इंडियाची सुरुवात २०१० मध्ये झाली होती. ही कंपनी प्रोसेस फायर हिटर्स, रिफॉर्मर्स आणि क्रॅकिंग फर्नेसेसचं डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय, इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंगच्या व्यवसायात आहे. कंपनीनं आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रकल्प पूर्ण केले आहेत.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक