शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार होत असले तरी गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच अनेक कंपन्यांचे आयपीओही येत आहेत. एकामागून एक येणारे आयपीओ ही गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे. अशातच भारतातील दिग्गज गुंतवणूकदार मानले गेलेले दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्याकडेही अनेक बड्या कंपन्यांचे लाखो शेअर्स आहेत. अशात रेखा झुनझुनवाला यांनी मल्टिबॅगर ठरलेल्या एका कंपनीतील गुंतवणूक वाढवलेली असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा झुनझुनवाला यांनी फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेडमध्ये १.२२ टक्के (९२,०२,१०८ इक्विटी शेअर्स) नवीन स्टेक विकत घेतला आहे. त्याच्या पोर्टफोलिओमधील हा नवीन स्टॉक आहे. फोर्टिस हेल्थकेअरच्या स्टॉकने या वर्षी आतापर्यंत सुमारे १८ टक्के परतावा दिला आहे. गेल्या दोन वर्षांत हा शेअर सुमारे १२२ टक्क्यांनी वधारला आहे.
रेखा झुनझुनवाला यांनी टाटा ग्रुपमधील आपली गुंतवणूक वाढवली
फोर्टिस हेल्थकेअर व्यतिरिक्त रेखा झुनझुनवाला यांनी जुलै-सप्टेंबर २०२२ या तिमाहीत सिंगर इंडिया लिमिटेडचे ७.९१ टक्के (४२,५० हजार इक्विटी शेअर्स) खरेदी केले आहेत. याशिवाय, टायटन (अतिरिक्त ०.६ टक्के), टाटा कम्युनिकेशन्स (अतिरिक्त ०.५ टक्के) आणि इंडियन हॉटेल्स लिमिटेड (अतिरिक्त ०.३ टक्के) या टाटा समूहातील कंपन्यांमध्येही रेखा झुनझुनवाला यांनी हिस्सा वाढवला आहे.
दरम्यान, याशिवाय रेखा झुनझुनवाला यांनी क्रिसिल लिमिटेडमधील अतिरिक्त ०.१ टक्के हिस्सा वाढवला आहे. एका रिपोर्टनुसार, राकेश झुनझुनवाला आणि असोसिएट्सच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या ३३,२२५.८ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले ३० स्टॉक असल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"