Join us

Reliance Power Share : एकीकडे Anil Ambani यांच्यावर बंदी घातली, दुसरीकडे Reliance Powerचे शेअर्स आपटले; लागलं लोअर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 12:58 PM

Reliance Power Share : कामकाजाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बाजार उघडल्यानंतर अनिल अंबानी (Anil Ambani) यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्सना ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं होतं. मात्र अनिल अंबानी यांच्यावरील बंदीची बातमी येताच शेअर्स जोरदार आपटले.

Reliance Power Share : कामकाजाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बाजार उघडल्यानंतर अनिल अंबानी (Anil Ambani) यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्सना ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं होतं, यानंतर कंपनीच्या शेअरनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, मात्र शेअर बाजार नियामक सेबीनं अनिल अंबानी यांच्यावर सिक्युरिटीज मार्केटमधून ५ वर्षांची बंदी घातल्याची बातमी येताच, शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली आणि त्यानंतर शेअरला लोअर सर्किट लागलं. या बातमीनंतर कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या घसरणीनंतर ३४.४८ रुपयांवर आला.

बंदीच्या बातमीनंतर घसरण 

आजच्या व्यवहारात रिलायन्स पॉवरनं ३६.७४ रुपयांच्या पातळीवर काम करण्यास सुरुवात केली, त्यानंतर काही वेळात शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटनंतर ३८.११ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. ही या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी होती. मात्र, बंदीच्या बातमीनंतर शेअरमध्ये ५ टक्क्यांची घसरण झाली.

एका वर्षात ११० टक्के परतावा

गेल्या सहा ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवरच्या शेअर्सनं ५ वेळा अपर सर्किटला धडक दिली. दरम्यान, रिलायन्स पॉवरच्या शेअर्सनं गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. गेल्या १२ महिन्यांत हा शेअर ११४ टक्क्यांनी वधारला आहे, तर वार्षिक आधारावर यात ५५ टक्क्यांनी वाढ झालीये.

फसवणुकीच्या आरोपाखाली बंदी

सेबीनं अनिल अंबानी यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून त्यांच्यावर सिक्युरिटीज मार्केटमधून ५ वर्षांची बंदी घातली आहे. याशिवाय अन्य २४ संस्थांवरही कारवाई करण्यात आली आहे. 'अनिल अंबानी यांनी आरएचएफएलच्या प्रमुख व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी संगनमत करून निधी काढण्यासाठी एक फसवी योजना आखली होती, जी त्यांनी त्यांच्याशी संबंधित संस्थांना कर्ज म्हणून लपवून ठेवली होती,' असं सेबीनं आपल्या अंतिम आदेशात म्हटलं होतं.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविशषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स