Join us  

Reliance Bonus Shares : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' दिवशी मिळणार बोनस शेअर्स; एक्सपर्ट बुलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 8:55 AM

RIL Bonus Share: रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या एजीएममध्ये गुंतवणूकदारांना १:१ बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर याची तारीख जाहीर करण्यात आलीये.

RIL Bonus Share: रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी कंपनीच्या एजीएममध्ये गुंतवणूकदारांना १:१ बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. यानंतर बोनस शेअर्स कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान, आता रिलायन्सनं याची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) शेअरहोल्डर्सना बोनस शेअर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कंपनीचे बोनस शेअर्स मिळण्यास पात्र भागधारक निश्चित करण्याची रेकॉर्ड डेट २८ ऑक्टोबर २०२४ आहे. या तारखेला रिलायन्सचे शेअर्स त्यांच्या डिमॅट खात्यात असणाऱ्या गुंतवणूकदारांना बोनस म्हणून एका शेअरच्या प्रमाणात एक शेअर मिळेल.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाली. मात्र, बुधवारी रिलायन्सच्या शेअरमध्ये किंचित वाढ दिसून आली. गेल्या ५ दिवसांत या शेअरमध्ये जवळपास दीड टक्क्यांची घसरण झाली आहे. दुसरीकडे मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या गेल्या महिन्याभरातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्यात ८ टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ३२१७.६० रुपये आणि नीचांकी स्तर २२२०.३० रुपये आहे.

एक्सपर्ट बुलिश

एचडीएफसी सिक्युरिटीजने आरआयएलवर 'अॅड' रेटिंग दिलं असून त्याची टार्गेट प्राईज किंमत ३,३५० रुपये निश्चित केली आहे. दुसरीकडे, नोमुराने आरआयएलवर 'बाय' रेटिंग दिलं असून त्याची टार्गेट प्राईज ३,४५० रुपये निश्चित केलीये. तर दुसरीकडे सीएलएसएनं ३,३०० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह आपलं 'आउटपरफॉर्म' रेटिंग कायम ठेवलं. आणखी एक कंपनी यूबीएसनं आरआयएलवर आपलं 'बाय' रेटिंग कायम ठेवलं असून त्याची टार्गेट प्राइस ३,२५० रुपये निश्चित केलीये. जेपी मॉर्गननं ३,१२५ रुपयांच्या टार्गेट प्राइससह 'ओव्हरवेट' रेटिंग कायम ठेवलंय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीशेअर बाजार