Reliance Capital Delist: पैसे कमवण्यासाठी अनेकजण शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात, पण माहिती नसल्यामुळे अनेकांना मोठा तोटा सहन करावा लागतो. सध्या अशीच स्थिती रिलायन्स कॅपिटलच्या इक्विटी गुंतवणूकदारांची झाली आहे. अनिल अंबानी यांची कर्जात बुडालेल्या रिलायन्स कॅपिटल कंपनीचे हिंदुजा ग्रुपची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्सने NCLT मार्फत अधिग्रहन केले आहे. त्यानंतर आता कंपनीच्या नवीन मालकाने रिलायन्स कॅपिटल लिमिटेडला शेअर बाजारातून डी-लिस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिलायन्स कॅपिटलचा गुंतवणूकदारांना धक्का या निर्णयामुळे शेअर बाजारात रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्सचे व्यवहार थांबले आहेत. रिलायन्स कॅपिटल शेअर्सचे शेवटचे ट्रेडिंग 26 फेब्रुवारी रोजी झाले होते. त्या दिवशी शेअरची किंमत 11.90 रुपये होती. डी-लिस्टिंगचा अर्थ असा आहे की, आता रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्सची खरेदी-विक्री होणार नाही किंवा गुंतवणूकदार शेअहर होल्ड करू शकणार नाहीत. म्हणजेच रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांचे मूल्यांकन शून्य झाले आहे. त्यांचे सर्व पैसे बुडाले आहेत.
शेअर डी-लिस्ट करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या शेअरची किंमत झिरोवर आली आहे. 26 फेब्रुवारी रोजी रिलायन्स कॅपिटलच्या शेअरची किंमत 11.90 रुपये होती. मात्र आता ती शून्य झाली आहे. शेअर धारकांना आता रिटर्नमध्ये काहीही मिळणार नाही. मात्र, हे सर्व बाजार नियामक सेबीच्या नियमांतर्गत घडले आहे. त्यामुळे लोकांना नेहमी असे शेअर्स टाळण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: ज्या कंपन्यांचे प्रकरण एनसीएलटीमध्ये सुरू आहे त्यांच्या शेअर्सबाबत सतर्क राहण्यास सांगितले जाते.
कधीकाळी शेअरची किंमत 2700 रुपये होतीएकेकाळी उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल लिमिटेड शेअर बाजारात वर्चस्व गाजवत असे. 2008 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 2700 रुपयांपेक्षा जास्त होती. हा स्टॉक त्याच्या उच्चांकावरुन जवळपास 99% ने घसरला आहे. 29 नोव्हेंबर 2021 रोजी आरबीआयने अनिल अंबानींच्या कंपनीचे बोर्ड बरखास्त केले, त्यानंतर कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून गेली आणि इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्सच्या मालकीची झाली. कंपनी ताब्यात घेताच हिंदुजा समूहाने रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स डी-लिस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
(टीप: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत नक्की घ्या.)