अनिल अंबानी यांच्या कर्जात बुडालेल्या रिलायन्स कॅपिटलच्या ट्रेडिंगला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या या कंपनीचा शेअर गेल्या शुक्रवारी बीएसईवर 10.33 रुपयांवर पोहोचला. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी या शेअरला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 12.39 रुपये एवढा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या शेअरने हा उच्चांक गाठला होता.
दरम्यान, रिलायन्स कॅपिटलच्या कर्जदारांच्या समितीची 54 वी बैठक 3 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडली. या बैठकीत, कंपनीच्या प्रशासक समितीला विक्री प्रक्रियेची स्थिती आणि पुढील वाटचालीसंदर्भात माहिती दिली. महत्वाचे म्हणजे, हिंदुजा समूहाने या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. नोव्हेंबर अखेर पर्यंत कंपनीचा मालकी हक्क हिंदुजा समूहाकडे असेल, असे मालले जात आहे. नुकतीच हिंदुजा ग्रुप कंपनीजचे (इंडिया) चेअरमन अशोक पी. हिंदुजा यांनी यासंदर्भात माहिती दिली होती.
हिंदुजा समूहाची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (आयआयएचएल) रिलायन्स कॅपिटलसाठी एकमात्र बोलीदाता कंपनी ठरली आहे. मात्र, टोरेंट इन्व्हेस्टमेंट्सने या प्रकरणी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. खरे तर, टोरेंट लिलावाच्या दुसऱ्या फेरीतच बाहेर पडली होती.
5 वर्षांत 99 टक्क्यांनी घसरला शेअर -
रिलायन्स कॅपिटलच्या शेअर मध्ये 99 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली आहे. हा शेअर केवळ 5 वर्षांच्या कालावधीतच 270 रुपयांवरून थेट 10 रुपयांवर आला आहे. तर 2008 मध्ये शेयरने 2770 रुपयांच्या पातळीला स्पर्श केला होता.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)