Join us  

३१२५ रुपयांवर जाणार RILचा शेअर? कंपनीला झाला १९,२९९ कोटींचा नफा; ब्रोकरेज हाऊस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 1:51 PM

RIL Share: रिलायन्स इंडस्ट्रिजला मोठ्या प्रमाणात नफा झाला असून, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.

RIL Share: शेअर मार्केटमध्ये चढ-उतार कायम आहे. जगातील परिस्थितीचा भारतीय शेअर मार्केटवर परिणाम होताना दिसत आहे. मात्र, यातच बहुतांश कंपन्यांचे गेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यातच काही कंपन्या चांगली कामगिरी करत असल्यामुळे शेअर्स चांगल्या प्रमाणात वाढत आहेत. यातच मुकेश अंबानी मालक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिज कंपनीचे शेअर ३१२५ रुपयांवर जाऊ शकतात, असा अंदाज ब्रोकरेज हाऊस व्यक्त करत आहेत. 

मुकेश अंबानींच्या मालकीची कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL)ची मार्च तिमाहीत कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. RIL ने आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत १९,२९९ कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावला आहे. हे वार्षिक आधारावर १९ टक्के अधिक आहे. RIL च्या टेलिकॉम आणि रिटेल सेगमेंटमध्येही वाढ चांगली झाली आहे. अनेक आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसनी यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असून, मोठे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

३१२५ रुपयांवर जाणार RILचा शेअर?

ब्रोकरेज हाऊस जेफरीज यांनी RIL शेअर्सला ‘बाय’ रेटिंग दिले आहे, ज्याचे लक्ष्य ३,१२५ रुपये आहे. ब्रोकरेज हाऊसच्या मते, EBITDA अंदाजापेक्षा चांगला होता, तर O2C आणि Jio विभागांनी त्याचे नेतृत्व केले. जिओने चांगले FCF तयार केले आहे. सध्या मूल्यांकन अनुकूल आहे आणि शेअरमध्ये आणखी मजबूत वाढ अपेक्षित आहे, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने RILच्या शेअरला २९६० रुपयांच्या उच्च लक्ष्यासह ‘बाय’ रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज म्हणते की, मजबूत O2C व्यवसायाने PAT च्या अंदाजापेक्षा जास्त कामगिरी केली. कॅपेक्स आणि कर्ज भाष्य सकारात्मक आहे. तसेच ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी RIL शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे आणि २८०० रुपयांचे लक्ष्य दिले आहे. हे सध्याच्या किमतीपेक्षा १९ टक्के अधिक आहे. 

दरम्यान, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या मार्च तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा नफा १९ टक्क्यांनी वाढून १९,२९९ कोटी रुपये झाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा आहे. तेल आणि पेट्रोकेमिकल व्यवसायातील उत्पन्नात वाढ आणि रिटेल आणि टेलिकॉमच्या मजबूत वाढीमुळे विक्रमी नफा झाला आहे. कंपनीचे उत्पन्न २.८ टक्क्यांनी वाढून २.३९ लाख कोटी रुपये झाले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षातील नफा ६६,७०२ कोटी रुपये आहे, जो आजपर्यंतचा सर्वाधिक वार्षिक नफा आहे. 

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीशेअर बाजारगुंतवणूक