देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) शेअरमध्ये सोमवारी बीएसईवर सुमारे 4 टक्क्यांची वाढ झाली आणि बाजार बंद होईपर्यंत कंपनीचा शेअर 3.48 टक्क्यांच्या वाढीसह 2708.05 रुपयांवर होता. या तेजीनंतर कंपनीचे मार्केट कॅप (Reliance Industries Market Cap) 18 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आणि दिवसभरात यात तब्बल 61,500 कोटी रुपयांची वाढ दिसून आली.
दरम्यान, रिलायन्सच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे आणि यादरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये 5.4 टक्क्यांची वाढ झाली. सध्या, कंपनीचा स्टॉक तीन महिन्यांनंतर म्हणजे 10 जून 2022 नंतर उच्चांकी पातळीवर आहे. 29 एप्रिल रोजी कंपनीचा शेअर 2,855 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होता.
रिलायन्सला 61,500 कोटी रुपयांचा फायदा
रिलायन्सच्या शेअर्समध्ये सुमारे साडेतीन टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर शुक्रवारच्या तुलनेत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 61,565 कोटी रुपयांची वाढ झाली. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 18,32,097.10 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी कंपनीचे मार्केट कॅप 17,70,532.20 कोटी रुपये होते.
आर्टिफॅक्स सेगमेंटमध्ये एन्ट्रीच्या तयारीत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स रिटेल आर्टिफॅक्ट्सच्या व्यवसायात उतरण्याचा विचार करत आहे. त्याचे पहिले आर्टिसन सेंट्रिक स्टोअर 'स्वदेश' दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये उघडले जाईल. गिफ्टिंग सेगमेंटमध्ये प्रवेश केल्याने रिलायन्ससाठी मोठी संधी मिळेल, कारण हा विभाग मोठ्या प्रमाणात असंघटित आहे. केवळ काही संघटित खेळाडूंची संपूर्ण भारतामध्ये उपस्थिती आहे.