Reliance Industries Target Price: रिलायन्स इंडस्ट्रीजनं पुन्हा बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनी यावेळी एका शेअरवर एक शेअर बोनस देत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजबाबत एक्सपर्टही बुलिश दिसून येत आहेत. जाणून घेऊया काय म्हणताहेत तज्ज्ञ आणि काय आहे याची टार्गेट प्राईज?
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, मोतीलाल ओसवाल यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला बाय रेटिंग दिलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं या शेअरला ३४३५ रुपयांचे टार्गेट प्राइस दिलंय. तर दुसरीकडे "रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोनस शेअरच्या घोषणेनंतर आता नवीन गुंतवणूकदार हा शेअर खरेदी करू शकतात.
गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की, पैसे मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठीच गुंतवावेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स १५ ते २० टक्क्यांनी वाढू शकतात. स्टॉपलॉस २९०० रुपये असेल," अशी प्रतिक्रिया मास्टर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडशी संबंधित विष्णूकांत उपाध्याय यांनी दिली. शुक्रवारी कंपनीचा शेअर ०.६९ टक्क्यांनी घसरून ३०१९.७५ रुपयांवर बंद झाला.
तिमाही निकाल कसे?
जून तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचं उत्पन्न २३५७६७ कोटी रुपये राहिलं आहे. जे वार्षिक आधारावर ११.५४ टक्क्यांनी अधिक आहे. परंतु मार्च तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण २.२० टक्क्यांनी कमी आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा करानंतरचा नफा १७४४८ कोटी रुपये झालाय. जून तिमाहीपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एकूण प्रवर्तकांचा हिस्सा ५०.३३ टक्के आहे. या कंपनीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा २१.५ टक्के आहे. तर, डीआयआयकडे १७.२५ टक्के हिस्सा आहे.
५ वेळा दिलेत बोनस शेअर्स
रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या ४ दशकात ५ वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीनं शेवटचा बोनस शेअर २०१७ मध्ये दिला होता. तेव्हा कंपनीने एका शेअरवर १ शेअरचा बोनस दिला. १९८० मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनं पहिल्यांदा बोनस शेअर दिला होता. त्यानंतर १९८३, १९९७ आणि २००९ मध्ये बोनस शेअर्स देण्यात आले. गेल्या १० वर्षांत कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना १६ वेळा लाभांशही दिला आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)