Join us  

रिलायन्सचा नफा कोसळला! दुपारी शेअर पडले, सायंकाळी तिमाहीचे निकाल आले; एवढे की...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:16 PM

तिमाहीत जिओ इन्फोकॉमचा नफा 12.2 टक्क्यांनी वाढला आहे. नवीन ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे.

कोरोना काळापासून छोट्या मोठ्या कंपन्या विकत घेण्याचा सपाटा लावलेल्या रिलायन्सच्या घोडदौडीला आज लगाम लागला आहे. मुकेश अंबानींच्यारिलायन्स इंडस्ट्रीजने जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यात रिलायन्स जिओ इन्फोकॉम (Jio) च्या टेलिकॉम शाखेचा नफा वार्षिक आधारावर वाढला आहे. परंतू, रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा जवळपास 11 टक्क्यांनी घसरला आहे. 

तिमाहीत जिओ इन्फोकॉमचा नफा 12.2 टक्क्यांनी वाढला आहे. नवीन ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. एप्रिल-जूनमध्ये त्यांचा निव्वळ नफा वाढून रु. 4,863 कोटी झाला आहे, जो एका वर्षापूर्वी रु. 4,335 कोटी होता. कंपनीचा परिचालन महसूल 9.9 टक्क्यांनी वाढून 24,042 कोटी रुपये झाला आहे.

जून तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा 10.8 टक्क्यांनी घसरून 16,011 कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 17955 कोटी रुपये होता. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि डाउनस्ट्रीम उत्पादनांची कमी प्राप्ती यामुळे महसुलात घट झाली आहे. या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 2.07 लाख कोटी रुपये झाले आहे, गेल्या वर्षी याच तिमाहीत ते 2.19 लाख कोटी रुपये झाले होते. तर महसूल वार्षिक 5.31 टक्क्यांनी घसरून 2,10,831 कोटी रुपये झाला आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजने कालच वित्तीय सेवा कंपनी वेगळी केली होती. यामुळे शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांनी घसरले होते. शेअर बाजारात ही घसरण पुढेही काही दिवस कायम राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.  

टॅग्स :रिलायन्सरिलायन्स जिओमुकेश अंबानी