Jio Financial Services Q2 Results: चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर २०२३) जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसनं (Jio Financial Services) ६६८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील तिमाहीतील नफ्यापेक्षा हा नफा सुमारे १०१ टक्क्यांनी अधिक आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा ऑगस्ट महिन्यात स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाल्यानंतर हा पहिला तिमाही निकाल आहे. ही आधी मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) होती, जी ऑगस्टमध्ये स्वतंत्र कंपनी म्हणून लिस्ट झाली होती.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे सप्टेंबर तिमाहीत एकूण उत्पन्न ६०८ कोटी रुपये होते. या कालावधीत, कंपनीनं व्याजातून सुमारे १८६ कोटी रुपये कमावले, जे मागील तिमाहीत कमावलेल्या २०२ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. स्टॉक एक्स्चेंजवर उपलब्ध आकडेवारीनुसार, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचं एकूण बाजार भांडवल सुमारे १.४३ लाख कोटी रुपये आहे.
नवे ग्रुप चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर
याशिवाय, कंपनीनं स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत असंही सांगितलं की त्यांनी एआर गणेश यांची १६ ऑक्टोबर २०२३ पासून ग्रुप चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. याआधी गणेश यांनी आयसीआयसीआय बँकेत मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) म्हणून सेवा बजावली होती. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या निकालापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी बीएसईवर कंपनीचे शेअर्स ०.१३ टक्क्यांच्या वाढीसह २२४.८५ रुपये प्रति शेअरवर बंद झाले.
अंबानींच्या 'या' कंपनीला ६६८ कोटींचा निव्वळ नफा, नुकतीच शेअर बाजारावर झाली होती लिस्ट
मागील तिमाहीतील नफ्यापेक्षा हा नफा सुमारे १०१ टक्क्यांनी अधिक आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:25 AM2023-10-17T10:25:32+5:302023-10-17T10:26:07+5:30