मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या लोटस चॉकलेट (Lotus Chocolate Share Price) या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह २४८४.४५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं उच्चांकी स्तर गाठला आहे. गेल्या महिनाभरात लोटस चॉकलेटच्या शेअरमध्ये १९१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ८५१.६५ रुपयांवरून २४८४ रुपयांवर गेले आहेत. लोटस चॉकलेटच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २१३ रुपये आहे.
३ वर्षांत ६३०० टक्क्यांची वाढ
गेल्या ३ वर्षात कंपनीचा शेअर ६३००% पेक्षा जास्त वधारला आहे. २० ऑगस्ट २०२१ रोजी कंपनीचा शेअर ३८.८० रुपयांवर होता. लोटस चॉकलेट कंपनीचा शेअर २३ ऑगस्ट २०२४ रोजी २४८४.४५ रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ७१३ टक्क्यांची वाढ झाली आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी कंपनीचा शेअर ३०५.७५ रुपयांवर होता. लोटस चॉकलेटच्या शेअरनं २३ ऑगस्ट २०२४ रोजी २४०० रुपयांचा टप्पा ओलांडला. गेल्या ६ महिन्यात मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये ६२५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या (आरआरव्हीएल) पूर्ण मालकीच्या रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडनं (आरसीपीएल) २४ मे २०२३ रोजी लोटस चॉकलेट कंपनीमध्ये कंट्रोलिंग स्टेक खरेदी केला. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) ही मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आहे. लोटस चॉकलेट कंपनी प्रामुख्याने चॉकलेट, कोको उत्पादनं आणि तत्सम उत्पादनांची निर्मिती करते.
नफ्यात मोठी वाढ
लोटस चॉकलेट कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर ४७०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कंपनीच्या महसुलात ३३७.४ टक्क्यांनी वाढ झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लोटस चॉकलेटचा निव्वळ नफा ९.४१ कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २० लाख रुपये होता. त्याचवेळी कंपनीचा महसूल वाढून १४१.३१ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ३२.२१ कोटी रुपये होता.(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविशषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)