Join us  

Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 3:42 PM

कंपनीचे शेअर्स वर्षभरापासून चर्चेत आहेत. या दरम्यान त्यात १३० टक्क्यांची प्रचंड वाढ झाली. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत ११ रुपये होती.

Reliance Power share: अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरचे (Reliance Power) शेअर्स वर्षभरापासून चर्चेत आहेत. या दरम्यान त्यात १३० टक्क्यांची प्रचंड वाढ झाली. कंपनीचा शेअर सध्या २६.२० रुपयांवर व्यवहार करत आहे. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत ११ रुपये होती. रिलायन्स पॉवरचा शेअर येत्या काही दिवसांत आणखी वाढू शकतो आणि हा शेअर ३४ रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असं ब्रोकरेजचं म्हणणं आहे. 

दिला दमदार परतावागेल्या पाच वर्षांत रिलायन्स पॉवरचा शेअर २५० टक्क्यांनी वधारला आहे. या दरम्यान त्याची किंमत ७ रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत वाढली आहे. रिलायन्स पॉवरचा आयपीओ जानेवारी २००८ मध्ये ४०५ ते ४५० रुपये प्रति इक्विटी शेअरच्या प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता आणि शेअर बीएसईवर ५४७.८० रुपये आणि एनएसईवर ५३० रुपयांवर लिस्ट झाला होता. शेअर लिस्टिंगनंतर रिलायन्स पॉवरला ३:५ बोनस शेअर्सही देण्यात आले. शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ३४.३५ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ११.०६ रुपये आहे. 

अलीकडच्या महिन्यात रिलायन्स पॉवरच्या दोन उपकंपन्यांनी ओथुम इन्व्हेस्टमेंटची शाखा असलेल्या रिलायन्स कमर्शियल फायनान्ससोबत १,०२३ कोटी रुपयांचे कर्ज फेडलं आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या कलाई पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आणि रिलायन्स क्लीनजेन लिमिटेड या दोन उपकंपन्यांनी ओथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडसोबत (आरसीएफएल) डेट सेटलमेंट आणि सूट करारावर स्वाक्षरी केली आहे. १,०२३ कोटी रुपयांचं कर्ज फेडण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 

रिलायन्स पॉवरनं महाराष्ट्रातील ४५ मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जीला १३२ कोटी रुपयांना विकण्याची घोषणा केल्यानंतर रिलायन्स कमर्शिअल फायनान्ससोबत डेट सेटलमेंट झाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये कलाई पॉवरनं अरुणाचल प्रदेशातील प्रस्तावित १,२०० मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाचे विकास हक्क टीएचडीसी इंडिया लिमिटेडला १२८ कोटी रुपयांना विकले. कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या मालमत्तांच्या विक्रीतून मिळवण्यात आलेला निधी कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात आला. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक