Rahul Gandhi on SEBI : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा बाजार नियामक SEBI वर निशाणा साधला आहे. SEBI ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात गेल्या 3 वर्षात शेअर बाजारातील 'फ्यूचर अँड ऑप्शन' ट्रेडिंगमुळे छोट्या गुंतवणूकदारांचे 1.8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. यावर राहुल गांधी म्हणतात की, छोट्या गुंतवणूकदारांच्या तोट्यातून पैसे कमावणारे 'मोठे खेळाडू' कोण आहेत? हे सेबीने सांगावे.
राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "गेल्या 5 वर्षांत फ्यूचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 45 पट वाढ झाली आहे. हे अनियंत्रितपणे वाढले आहेत. गेल्या तीन वर्षांत 90 टक्के छोट्या गुंतवणूकदारांचे 1.8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या छोट्या गुंतवणूकदारांच्या तोट्यामुळे फायदा झालेल्या तथाकथित 'मोठ्या खेळाडूंची' नावे सेबीने जाहीर करावीत."
दरम्यान, यापूर्वीही राहुल गांधी यांनी शेअर बाजारातील अनेक ट्रेंडबाबत सेबीच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस अनेक दिवसांपासून सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्यावर टीका करत आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात माधबी पुरी बुच यांचे गौतम अदानींसोबत कथित आर्थिक संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेस सातत्याने माधबी यांच्यावर टीका करत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
काय आहे सेबीचा अहवाल?SEBI ने सोमवारी एक अहवाल जारी केला, ज्यामध्ये 73 लाख(91%) व्यापाऱ्यांना मागील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगमुळे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. प्रत्येक व्यावसायिकाचे सरासरी 1.2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या काळात छोट्या व्यापाऱ्यांचे एकूण 75 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, गेल्या 3 आर्थिक वर्षांमध्ये या सेगमेंटमध्ये व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांचे एकूण नुकसान 1.8 लाख कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
फ्यूचर आणि ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय?फ्यूचर आणि ऑप्शन हे शेअर बाजारात शेअर खरेदी आणि विक्रीचे एक मार्ग आहेत. ही मोठ्या जोखमीची गुंतवणूक आहे. यामध्ये कमी भांडवलातही मोठी बेट्स लावून शेअर ट्रेडिंगमधून नफा मिळवता येतो. पण, नुकसानीचा धोका देखील समान असतो. यामध्ये, गुंतवणूकदार शेअरच्या अंदाजे भावी किमतीवर बेट लावतो. म्हणजेच, गुंतवणूकदाराला शेअरच्या वरच्या किंवा खालच्या किमतीवर पैसे लावू शकतो.
उदाहरण- समजा आज XYX कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपये आहे, परंतु तुमचा अंदाज आहे की, डिसेंबर 2024 मध्ये एका निश्चित तारखेपर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत 150 रुपये असेल. अशाप्रकारे तुम्ही XYX कंपनीच्या 100 शेअर्ससाठी रु. 150 मूल्याचा सौदा ऑफर केला. आता समजा तुमच्या अंदाजानुसार XYX शेअरची किंमत रु. 150 पर्यंत पोहोचली, तर तुम्हाला तुमच्या भावी करारावर 5,000 रुपये थेट नफा होईल. तुमच्या शेअरची अपेक्षित किंमत न मिळाल्यास तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.
(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)