देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपन्यांपैकी एक रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज पुन्हा एकदा 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. बाजार उघडताच तो एक टक्क्यांहून अधिक वाढीसह 2764.50 रुपयांवर गेला. मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांकडूनरिलायन्सचे शेअर्स खरेदी केले जात आहेत.
कंपनीने आपली वित्तीय सेवा कंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्सचं डीमर्जर केलं असून शेअर्ससाठी 20 जुलै ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. त्याआधी अधिकाधिक गुंतवणूकदार रिलायन्सचे शेअर्स खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे, शेअरच्या किमतीत आणि व्हॉल्यूममध्ये बरीच वाढ झाली आहे. डिमर्जरच्या डीलनुसार रिलायन्सच्या भागधारकांना प्रत्येक शेअरसाठी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा (JFSL) चा एक शेअर मिळेल. रिलायन्सचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना 19 जुलैपर्यंत वेळ आहे जेणेकरून त्यांना JFSL शेअर्स मिळू शकतील. त्यामुळे रिलायन्सचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची मोठी रांग लागली आहे.
लिस्टिंगची योजना
मुकेश अंबानी सप्टेंबरपर्यंत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसला (JFSL) लिस्ट करण्याची योजना आखत आहेत. यामुळे रिलायन्सच्या 36 लाख शेअर होल्डर्सची व्हॅल्यू अनलॉक होईल. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कॅपिटलच्या बाबतीत देशातील पाचवी सर्वात मोठी वित्त कंपनी असेल आणि पेटीएम तसंच बजाज फायनान्सशी थेट स्पर्धा करेल. रिलायन्सच्या एजीएममध्ये, अंबानी कंपनीच्या रोडमॅपबाबत विस्तृतपणे सांगण्याची शक्यता आहे. कंपनीनं अद्याप एजीएमची तारीख जाहीर केलेली नाही.