ड्रोन तयार करणारी डिफेन्स क्षेत्रातील कंपनी झेन टेक्नॉलॉजीजच्या (Zen Technologies) शेअरमध्ये आज ५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स एनएसईवर ५ टक्क्यांच्या वाढीनंतर ७५४ रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या स्टॉकला यानंतर अपर सर्किट लागलं. कंपनीच्या शेअर्समध्ये आलेल्या या तेजीचं कारण म्हणजे कंपनीला मिळालेली ४२ कोटी रुपयांची एक्सपोर्ट ऑर्डर आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून कंपनीला अनेक वर्क ऑर्डर मिळाल्या आहेत. संरक्षण क्षेत्रावर सरकारचा फोकसही वाढला आहे. संरक्षण क्षेत्रासाठी जास्तीत जास्त शस्त्रास्त्रं भारतात तयार व्हावीत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे झेन टेक्नॉलॉजीजसारख्या कंपन्यांना त्याचा फायदा होताना दिसतोय. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून १०० कोटी रुपयांचं काम मिळालं होतं.
सप्टेंबर महिन्यात झेन टेक्नॉलॉजीजनं शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत त्यांना संरक्षण क्षेत्राकडून अँटी ड्रोन सिस्टम्ससाठी २२७.८५ कोटी रुपयांचं काम मिळाल्याचं म्हटलं होतं.
लिस्टिंगपेक्षा १००० टक्क्यांची वाढ
२०२३ मध्ये कंपनीच्या शेअरचा भाल १८९.९५ रुपयांच्या पातळीवरुन ७५८.५५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. कंपनीनं गेल्या ११ महिन्यांमध्ये ३०० टक्क्यांपेक्षा अधिकची तेजी दिसून आली आहे. २०१६ मध्ये झेन टेक्नॉलॉजीजनं शेअर बाजारात पदार्पण केलं होतं. तेव्हापासून कंपनीच्या शेअरमध्ये १०५७ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)