Join us  

सचिन तेंडुलकर, आमिर खान यांच्यासह दिग्गजांना IPO नं केलंय मालामाल, पाहा कोणते आहेत आयपीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 3:09 PM

गेल्या काही वर्षांत कंपन्यांनी आयपीओंच्या माध्यमातून मोठा पैसा उभा केला आहे. या काळात बहुतांश आयपीओची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

Stock Market News Updates: गेल्या काही वर्षांत कंपन्यांनी आयपीओंच्या माध्यमातून मोठा पैसा उभा केला आहे. या काळात बहुतांश आयपीओची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनीही भरपूर पैसा कमावला आहे. या गुंतवणूकदारांच्या यादीत सचिन तेंडुलकर, आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि अजय देवगण यांसारख्या दिग्गजांचाही समावेश आहे. कोणत्या कंपनीतून कोणी मोठी कमाई केलीये हे आपण पाहू. 

आमिर खान, रणबीर कपूर - ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन 

या कंपनीच्या आयपीओद्वारे आमिर खान आणि रणबीर कपूर यांनी चांगला नफा कमावला होता. आयपीओपूर्वी आमिर खानकडे 46,600 शेअर्स (25 लाख) होते. त्याचवेळी रणबीर कपूरकडे 37,200 शेअर्स (20 लाख रुपये) होते. आयपीओपूर्वी कंपनीच्या शेअर्सची किंमत सुमारे 53.59 रुपये होती. कंपनी शेअर बाजारात 102 रुपयांना लिस्ट झाली होती. तर 7 मार्च रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 155.85 रुपये प्रति शेअर होती. सध्या आमिर खानच्या गुंतवणुकीचे मूल्य 72.62 लाख रुपये आणि रणबीर कपूरच्या गुंतवणुकीचे मूल्य 57.97 लाख रुपये झालं आहे. 

सचिन तेंडुलकर (आझाद इंजिनिअरिंग)  

सचिन तेंडुलकरनं आझाद इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक केली आहे. मार्च 2023 मध्ये त्यांनं कंपनीचे 438120 शेअर्स खरेदी केले आहेत. तेव्हा त्यांनी हे शेअर्स 114.10 रुपयांना खरेदी केले होते. कंपनी 28 डिसेंबर रोजी 720 रुपयांवर लिस्ट झाली होती. तर 7 मार्च रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 1353.30 रुपये होती. म्हणजेच सचिन तेंडुलकरला आतापर्यंत गुंतवणूकीवर 12 पट परतावा मिळाला आहे. सध्या त्यांच्या शेअर्सची किंमत 59.39 कोटी रुपये आहे.  

आलिया भट्ट, कतरिना कैफ - नायका 

जुलै 2020 मध्ये, आलिया भट्टने Nykaa मध्ये 4.95 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. 10 नोव्हेंबर 2021 रोजी शेअर बाजारात कंपनी लिस्ट झाली. सध्या त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर 11 पट परतावा मिळाला आहे. त्याचवेळी कतरिना कैफने IPO पूर्वी कंपनीत 2.04 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तिच्या गुंतवणुकीचे मूल्य आतापर्यंत 11 पटीने वाढून 22 कोटी रुपये झाले आहे.  

अजय देवगण - पॅनोरमा स्टुडिओ  

4 मार्च रोजी अजय देवगणनं पॅनोरमा स्टुडिओचे 1,00,000 शेअर्स 274 रुपयांना विकत घेतले. यासाठी त्यानं 2.74 कोटी रुपये खर्च केले आहेत. 948.40 रुपयांच्या बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत त्यांनं हे शेअर्स खरेदी केले होते. 7 मार्च रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 995 रुपये होती.  

(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली होती. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक