Join us  

४२ देशांमध्ये दूध, दही, पनीरची विक्री; आता कंपनी देतेय ६००%चा बंपर डिविडंट, कधी मिळणार पैसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 2:31 PM

कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ५४.२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

कंझ्युमर फुड्स तयार करणारी कंपनी हातसन अॅग्रो प्रोडक्टनं बुधवारी आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 54.2 टक्के वाढ नोंदवली गेली आणि ती 80.2 कोटी रुपये झाली. यानंतर कंपनीनं आपल्या शेअरहोल्डर्ससाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. गुंतवणूकदारांसाठी 600 टक्क्यांचा बंपर लाभांश (Hatsun Agro Dividend Announcements) जाहीर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कंपनीच्या मार्जिनमध्येही मोठी सुधारणा झाली आहे. गुरुवारी कामकाजादरम्यान हा शेअर 1046 रुपयांवर पोहोचला होता. तर बुधवारी कंपनीचा शेअर 976 रुपयांच्या (Hatsun Agro Share Price) पातळीवर बंद झाला होता.

बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, कंपनीनं 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या आधारे 600 टक्के म्हणजेच प्रति शेअर 6 रुपये लाभांश जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष 2024 साठी हा पहिला अंतरिम लाभांश आहे. 27 जुलै ही रेकॉर्ड डेट (Hatsun Agro Dividend Record Date) निश्चित करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट 2023 पर्यंत लाभांश दिला जाणार आहे.

मार्च तिमाहीच्या निकालांबद्दल बोलायचं तर, कपंनीचा महसूल 1789.56 कोटी रुपये होता. तर कंपनीला 24.98 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. वर्षभरापूर्वी त्याच तिमाहीत म्हणजेच जून 2022 मध्ये कंपनीचा एकूण महसूल 2014.60 कोटी रुपये होता. तर निव्वळ नफा 51.95 कोटी रुपये होता.

कोणत्या नावानं विकतात प्रोडक्ट्स?कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या कंपनीचा व्यवसाय 42 देशांमध्ये पसरलेला आहे. देशातील 10 लाख घरांमध्ये त्यांची उत्पादनं वापरली जातात. कंपनीची उत्पादनं 42 देशांमध्ये निर्यात केली जातात. कंपनी प्रामुख्याने अमेरिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये निर्यात करते. अरुण आईस्क्रीम्स, आरोक्या मिल्क, हातसन दही, हातसन पनीर, हातसन तूप, हातसन डेअरी व्हाईटनर या नावानं त्याची उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. भारतात त्यांची उत्पादनं तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये उपलब्ध आहेत.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक