Join us  

SBI ची दमदार कामगिरी; पाच दिवसांत 27000 कोटींची कमाई, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 2:36 PM

Top-10 Firms Market Value : गेल्या आठवड्यात टॉप-10 पैकी सहा कंपन्यांचे मार्केट कॅप 71000 कोटी रुपयांनी कमी झाले.

Top-10 Firms Market Value : भारत देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या SBI च्या शेअर्समध्ये वाढीचा कल कायम आहे. गेल्या आठवड्यात यात वादळी वाढ झाली, त्याचा परिणाम बँकेच्या बाजार भांडवलावर (SBI मार्केट कॅप) देखील दिसून आला. सेन्सेक्सच्या टॉप-10 मौल्यवान कंपन्यांमध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिला. SBI गुंतवणूकदारांच्या संपत्तीत पाच दिवसांत तब्बल 27 हजार कोटींची वाढ झाली. दुसरीकडे, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ला मोठ्या प्रमाणात तोटा झाला.

सहा कंपन्यांचे 71000 कोटींचे नुकसान बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या 30-शेअर सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकत्रितपणे 71,414.03 कोटी रुपयांची घसरण झाली. यामध्ये एलआयसी ते रिलायन्स इंडस्ट्रीजपर्यंतंचा समावेश आहे. असे असूनही बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स गेल्या आठवड्यात 831.15 अंकांनी किंवा 1.16 टक्क्यांनी वर राहिला. ज्या चार कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठी कमाई करुन दिली, त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचा समावेश आहे. एकत्रितपणे त्यांच्या मार्केट कॅपमध्ये 62,038.86 कोटी रुपयांची वाढ झाली. 

गेल्या आठवड्यात SBI आघाडीवर राहिली आणि पाच दिवसांच्या ट्रेडिंग दरम्यान, SBI मार्केट कॅप रु. 27,220.07 कोटींनी वाढून रु. 6,73,585.09 कोटी झाले. गेल्या आठवड्यात एसबीआयचे शेअर्स रॉकेटच्या वेगाने धावत सर्वकालीन उच्चांकांवर पोहचले. शुक्रवारी एसबीआय शेअर 763.90 रुपयांच्या पातळीवर उघडला आणि दिवसाच्या व्यवहारादरम्यान 774.70 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला.

LIC सह या कंपन्यांना फटकागेल्या आठवड्यात ज्या कंपन्यांना मोठा फटका बसला, त्यात एलआयसी पहिल्या स्थानावर आहे. कंपनीचे मार्केट कॅप 26,217.12 कोटी रुपयांनी घसरून 6,57,420.26 कोटी रुपयांवर आले. याशिवाय देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचे मार्केट कॅप 18,762.61 कोटी रुपयांनी घटून 14,93,980.70 कोटी रुपये झाले, आयटीसीचे 13,539.84 कोटींनी घटून 5,05,092.18 कोटी रुपये, तर हिंदुस्तान युनिव्हरचे मार्केट कॅप 11,548.24 कोटी रुपयांनी घसरून 5,58,039.67 कोटी रुपयांवर आले.

भारती एअरटेलदेखील 703.60 कोटी रुपयांनी घसरुन 6,30,340.9 कोटी रुपये राहिले, तर मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 642.62 कोटी रुपयांनी घसरून 19,926.49 कोटी रुपये झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली असली तरी, मुकेश अंबानी यांची कंपनी देशातील टॉप 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर राहिली आहे. 

(टीप-शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

टॅग्स :एसबीआयबँकबँकिंग क्षेत्रशेअर बाजारशेअर बाजार