एसबीआय म्युच्युअल फंडाला (SBI Mutual Fund) आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँक इंडसइंड बँकेतील (Induslnd Bank) ९.९९ टक्के भागभांडवल खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) बुधवारी, ११ ऑक्टोबर रोजी ही मंजुरी दिली. एसबीआय म्युच्युअल फंडानं दिलेल्या अर्जाच्या संदर्भात मंजुरी देण्यात आली असल्याचं रिझर्व्ह बँकेनं एका निवेदनाद्वारे म्हटलंय. इंडसइंड बँकेनं स्टॉक एक्स्चेंजला माहितीत या अधिग्रहणानंतर, एसबीआय म्युच्युअल फंडाला बँकेच्या व्होटिंग राईट्समध्ये ९.९९ टक्के हिस्सा मिळणार असल्याचं म्हटलंय.
रिझर्व्ह बॅंकेने एसबीआय म्युच्युअल फंडाला एका वर्षाच्या कालावधीत म्हणजेच १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत बॅंकेतील हा स्टेक घेण्याचा सल्ला दिला आहे. "यापुढे, एसबीआय म्युच्युअल फंडाला हे सुनिश्चित करानं लागेल की बँकेतील एकूण शेअरहोल्डिंग नेहमी बँकेच्या पेड-अप शेअर भांडवलाच्या किंवा मतदानाच्या अधिकाराच्या ९.९९ टक्क्यांपेक्षा जास्त नसावं," रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटलंय.
यापूर्वीही मान्यता
याआधी मे महिन्यात, आरबीआयनं एसबीआय फंड मॅनेजमेंटला देशातील आणखी एक महत्त्वाची खासगी बँक एचडीएफसी बँकेतील ९.९९ टक्के भागभांडवल घेण्यास मान्यता दिली होती आणि कंपनीला ही प्रक्रिया ६ महिन्यांत पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. SBI फंड्स मॅनेजमेंट हे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि फ्रान्सच्या अमुंडी (Amundi) कंपनीचा संयुक्त उपक्रम आहे.
शेअर्सवर परिणाम
दरम्यान, बुधवारी एनएसईवर इंडसइंड बँकेचे शेअर्स ०.०७४ टक्क्यांनी वाढून १,४१९.५० रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ०.६८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, गेल्या ६ महिन्यांत या शेअरसनं आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे ३२.०८ टक्के परतावा दिला आहे. गुरुवारी कामकाजादरम्यान, इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये ०.९७ टक्क्यांची वाढ झाली असून ते १४३५ रुपयांवर व्यवहार करत होते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)