Join us  

SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 2:06 PM

MTNL Share Price: ३० जूनपासून हप्ते आणि व्याज न भरल्यानं स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) कर्जबाजारी सरकारी कंपनीवर मोठी कारवाई केली आहे.

MTNL Share Price: ३० जूनपासून हप्ते आणि व्याज न भरल्यानं स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) कर्जबाजारी सरकारी कंपनी एमटीएनएलची (MTNL) कर्जाची खाती अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) म्हणून जाहीर केली आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनीनं शेअर बाजाराला ही माहिती दिली. ३० सप्टेंबरपर्यंत एमटीएनएलच्या कर्ज खात्यावर एकूण थकबाकी ३२५.५२ कोटी रुपये होती, असं एसबीआयनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय.

काय म्हटलं कंपनीनं?

एसबीआयनं १ ऑक्टोबर २०२४ च्या पत्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार व्याज आणि हप्ते न भरल्यामुळे एमटीएनएलचं टर्म लोन अकाऊंट खातं ३६७२६६५८९०३ हे २८ सप्टेंबर २०२४ पासून एनपीए - निम्न मानक श्रेणीत टाकण्यात आलं आहे. जर डिफॉल्ट कालावधी १२ महिन्यांपेक्षा कमी असेल आणि थकबाकीची परतफेड करण्याची क्षमता एनपीए म्हणून असेल तर बँका एनपीए-निम्न मानक असलेल्या खात्यांचं वर्गीकरण करतात. एसबीआयनं, एमटीएनएलकडे २८१.६२ कोटी रुपयांची थकबाकी आहे आणि खातं नियमित करण्यासाठी ते त्वरित फेडलं जावं, असं म्हटलं आहे.

शेअर आपटला

एमटीएनएलच्या शेअरची किंमत ५४.८८ रुपये आहे. शुक्रवारी तो एका दिवसापूर्वीच्या तुलनेत ३.५५ टक्क्यांनी घसरून बंद झाला. २९ जुलै २०२४ रोजी शेअरचा भाव १०१.८८ रुपये होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये शेअरची किंमत २५.२२ रुपयांच्या नीचांकी पातळीवर होती. हे शेअरचे अनुक्रमे ५२ आठवड्यांतील उच्चांक आणि नीचांकी स्तर आहेत.

कोणत्या बँकेकडून किती थकबाकी?

एमटीएनएलनं ऑगस्टमध्ये शेअर केलेल्या तपशीलानुसार, युनियन बँक ऑफ इंडियाकडे १५५.७६ कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाकडे १४०.३७ कोटी रुपये, बँक ऑफ इंडियाकडे ४०.३३ कोटी रुपये, पंजाब अँड सिंध बँकेकडे ४०.०१ कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडे ४१.५४ कोटी रुपये, युको बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे ४.०४ कोटी रुपये भरलेले नाहीत.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाएमटीएनएल