SBI Share Price : शेअर बाजाराच्या कामकाजाच्या सत्रादरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. बँकेने 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. बँकेचे उत्पन्न बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. या कालावधीत बँकेच्या निव्वळ नफ्यात वार्षिक 74 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ताही सुधारली आहे. यासोबतच कर्जातही मजबूत वाढ दिसून आली आहे.
30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेला व्याजामधून मिळणारे उत्पन्न वार्षिक 12.83 टक्क्यांनी वाढून 35,183 कोटी रुपये झाले आहे. बँकेला व्याजाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात गेल्या दोन तिमाहीत वाढ दिसून येत आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा क्रेडिट ग्रोथ रेट उत्कृष्ट राहिला आहे. काही मोठ्या खाजगी बँकांपेक्षाही तो चांगला आहे.
ऑपरेटिंग ग्रोथमध्येही वाढ
भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की वार्षिक आधारावर कर्जाच्या वाढीमध्ये 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे कंपनीचे मूळ व्याजाद्वारे मिळणारे उत्पन्न आणि ऑपरेटिंग ग्रोथमध्येही चांगली वाढ झाली आहे.
कामकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात एसबीआयचा शेअर NSE वर 19.75 रुपये किंवा 3.28 टक्क्यांच्या वाढीसह 613.30 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. स्टॉकचा दिवसाचा नीचांकी स्तर 612.50 रुपये आहे तर दिवसाचा उच्चांकी स्तर 622.70 रुपये आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 622.70 रुपये आहे, तर स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 425.00 रुपये आहे.
काय म्हणतात तज्ज्ञ?
ICICIdirect विश्लेषक काजल गांधी यांनी स्टॉकसाठी 700 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. एसबीआय सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. या शेअरमध्ये पुढे जाऊन मजबूत तेजी पाहायला मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
LKP सिक्युरिटीजचे अजित कुमार काबी म्हणतात की, FY 2024 पर्यंत, SBI चे RoA आणि RoE 0.9 टक्के आणि 15 टक्क्यांच्या पातळीवर पाहिले जाऊ शकतात. बँकेची बॅलन्सशिट अतिशय मजबूत आहे. यासोबतच त्याचे प्रोव्हिजन कव्हरेज रेशो देखील मजबूत स्थितीत आहे. यासोबतच बँकेच्या मालमत्तेचा दर्जाही स्थिर राहिला आहे. त्यामुळे या शेअरमध्ये पुढे चांगली वाढ होऊ शकते.
(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)