- पवन देशपांडे, सहायक संपादक
ही मिनिटांत पैसै दुप्पट.. वन इज टू टेन... अमूक स्ट्रॅटेजी वापरून रोज फक्त कमाई करा... तोट्याची बातच नाही.. अशा अनेक प्रलोभनांना भुलणाऱ्यांना सेबीच्या अहवालाने आरसा दाखवला आहे. आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली, ती म्हणजे ९१ टक्क्यांहून अधिक सामान्य गुंतवणूकदारांना तोटा होऊनसुद्धा त्यातले ७६ टक्के लोक गेल्या दोन वर्षांपासून अजूनही हाच तोट्याचा खेळ खेळत आहेत.
वित्त वर्ष २०२२ ते २०२४ या कालावधीत ‘फ्युचर अँड ऑप्शन्स’ क्षेत्रात गुंतवणूकदारांचे तब्बल १.८ लाख कोटी रुपये बुडाले असल्याचे भांडवली बाजार नियामक सेबीने नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. ‘फ्युचर अँड ऑप्शन्स’मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ९१.१ टक्के वैयक्तिक गुंतवणूकदारांना गेल्या वित्त वर्षात तोटा झाला आहे. स्वतः सेबीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्याकडे अधिक सजगतेने पाहणे गरजेचे आहे. कारण अशा गुंतवणूक पर्यायातून कमावणाऱ्यांची संख्या कमी आणि गमावणाऱ्यांची संख्या अधिक असे हे चित्र आहे. कोणाचा पीएफचा पैसा, कुणाचा व्यवसायातील नफा, कुणाची ग्रॅच्युईटी, कुणाची बचत अशी ही
सामान्य गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील गुंतवणूक असते. त्यातले ८० टक्के लोक या फ्युचर-ऑफ्शनच्या महाजालात अडकतात.
सर्वसामान्य लोकांनी शेअर बाजाराकडे वळावे आणि त्यांनीही पैसा कमवावा, अशी सुविचारी वाक्ये अलीकडे अनेकांकडून ऐकायला मिळतात. पण त्यांनी कोणत्या जाळ्यात अडकू नये, कुठे फसू नये याची फारशी माहिती कोणी देत नाही. त्यामुळे
पैसा डबल... झटपट कमाई... एक्स्पायरीच्या दिवशी स्विंग ट्रेड... अशा भानगडीत
कधीपर्यंत पडायचे याचा विचार आता गुंतवणूकदारांनी करावा.
हे जास्त धक्कादायक
ट्रेडिंगची रक्कम १ लाखांपर्यंत असणाऱ्या ३३.२ लाख गुंतवणूकदारांनी वित्त वर्ष २०२२ ते २४ या काळात फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेडिंग केले. त्यापैकी ३०.४ लाख लोकांना तोटा सहन करावा लागला आहे.
१ लाखाच्या आत ट्रेड घेणारे हे सर्वसामान्य गुंतवणूकदार होते. त्यांची कमाई काही तासांत किंवा काही दिवसांत एफअँडओमध्ये उडाली.
या तोट्याची सरासरी रक्कम २,६०० रुपये एवढी होती तर वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये झालेला तोटा ७८८ कोटी रुपये होते. हे अधिक धक्कादायक आहे.
फायदा कुणाला, तोटा कुणाचा?
रक्कम गुंतवणूकदार
१० कोटींहून अधिक फायदा १०१
१० कोटींहून अधिक तोटा १२७
१ ते १० कोटींचा फायदा २,४००
१ ते १० कोटींचा तोटा १०,८००
१० लाख ते १ कोटींचा फायदा २६,५००
१० लाख ते १ कोटींचा तोटा ३,९०,८००