Join us  

इन्फ्लुएन्सर रविंद्र भारतीवर SEBI चा चाबूक, ₹१२ कोटी परत करण्याचे आदेश; १००० टक्क्यांचा दावा अंगलट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 12:40 PM

बाजार नियामक सेबी (SEBI) शेअर बाजाराशी संबंधित दिशाभूल करणारे सल्ले देणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे. सेबीनं कठोर कारवाई करत प्रसिद्ध फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर (Finfluencer) रवींद्र भारती याच्यावर बंदी घातली आहे.

Finfluencer Ravindra Bharti SEBI: बाजार नियामक सेबी (SEBI) शेअर बाजाराशी संबंधित दिशाभूल करणारे सल्ले देणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे. सेबीनं कठोर कारवाई करत प्रसिद्ध फायनान्शिअल इनफ्लुएन्सर (Finfluencer) रवींद्र भारती याच्यावर बंदी घातली आहे. त्याला १२ कोटी रुपये देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. रवींद्र भारती याच्यावर १००० टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचा दावा केल्याचा आरोप आहे. त्याची पत्नी शुभांगी आणि कंपनी रविंद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्युटलाही याचा फटका बसलाय. 

पत्नी आणि कंपनीवरही बंदी 

रविंद्र भारती आणि त्याची पत्नी सिक्युरिटी मार्केटमधील कोणत्याही उपक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत, असे आदेश सेबीनं दिलेत. त्यांना हे १२ कोटी रुपये एस्क्रो खात्यात जमा करावे लागतील. त्यानी हा पैसा चुकीच्या पद्धतीनं कमावल्याचं सेबीनं म्हटलंय. रवींद्र भारती प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सर आहे. त्याचे २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रविंद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूटची (Ravindra Bharti Education Institute) स्थापना २०१६ मध्ये पत्नी शुभांगीसह केली होती. 

वेबसाईट / युट्युबवरही कारवाई 

त्यांची कंपनी शेअर मार्केट ट्रेडिंगशी संबंधित शैक्षणिक कामं करत होती. याशिवाय तो भारती शेअर मार्केट नावाची वेबसाइटही चालवतो. याशिवाय भारती शेअर मार्केट मराठी (Bharti Share Market Marathi) आणि भारती शेअर मार्केट हिंदी (Bharti Share Market Hindi) नावाचे दोन यूट्यूब चॅनेल देखील चालवले जातात. त्यांचे अंदाजे १८.२२ लाख ग्राहक आहेत. हे देखील कारवाईच्या कक्षेत आले आहेत. 

१,००० टक्क्यांपर्यंत परताव्याचं आमिष 

गुंतवणूकदारांना २५ टक्के ते १,००० टक्क्यांपर्यंतच्या अंदाजित परताव्यासह सल्लागार सेवा घेण्याचं आमिष दाखवण्यात आलं. सेबीच्या मते, नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्लागार सेवांमध्ये गुंतणं नियामक नियमांचं उल्लंघन करतं. त्यामुळे एकूण १२,०३,८२,१३०.९१ रुपये इतका अवैध नफा जप्त केला जाईल. याशिवाय, सेबीनं संस्थांना गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करण्यापासून किंवा गुंतवणूक सल्लागार म्हणून स्वतःला रोखणं आणि गुंतवणूक सल्लागार सेवा प्रदान करण्यापासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :सेबीशेअर बाजारगुंतवणूक