Join us  

देशातील सर्वात मोठ्या IPO ला SEBI चा हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी येणार Hyundai Motors च्या इश्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:45 AM

Hyundai Motors IPO : दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई मोटरची भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडनं आपला आयपीओ लाँच करण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे.

Hyundai Motors IPO : दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई मोटरची भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडनं आपला आयपीओ लाँच करण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. कंपनीचा प्रस्तावित आयपीओ ३ अब्ज डॉलर्सचा आहे. बाजार नियामक सेबीने या इश्यूला हिरवा झेंडा दाखवला आहे, अशी माहिती सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर मनीकंट्रोलला दिली. कंपनीनं जूनमध्ये या इश्यूसाठी ड्राफ्ट सादर केला होता.

"बाजार नियामकाचं फायनल ऑब्झर्व्हेशन समोर आलं आहे. हा विक्रमी आयपीओ ऑक्टोबरमध्ये लाँच केला जाईल," अशी माहिती सूत्रांनी दिली.  जर कंपनीचा लिस्टिंग प्लॅन यशस्वी झाला तर हा इश्यू भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरेल आणि सरकारी कंपनी एलआयसीचा २.७ अब्ज डॉलर्सचा लिस्टिंगचा विक्रम मोडू शकतो. या आयपीओमध्ये प्रमोटर शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून केली जाणार आहे.

ह्युंदाई मोटर इंडियानं १५ जून रोजी मार्केट रेग्युलेटरकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा ड्राफ्ट दाखल केला होता. कंपनीनं १८ अब्ज डॉलर्स ते २० अब्ज डॉलरदरम्यान मूल्यांकनाचं टार्गेट ठेवलं आहे. कंपनीच्या डीआरएचपीमध्ये दिलेल्या माहितीनुसार 'या ऑफरद्वारे प्रवर्तकांकडून प्रत्येकी १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे १४,२१,९४,७०० इक्विटी शेअर्स विकले जातील. तसंच शेअर्सच्या लिस्टिंगमुळे कंपनीच्या ब्रँड इमेज मजबूत आणि लिक्विडिटी मिळण्यास मदत होणार आहे.'

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ह्युंदाई मोटर इंडिया प्रवासी संख्येनुसार भारतातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी होती. गेल्या वर्षभरात ह्युंदाईची प्रतिस्पर्धी कंपनी मारुतीच्या शेअरमध्ये २०.२५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :सेबीशेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगह्युंदाई