Join us

Sebi Issues Code: सावधान! शेअर मार्केटच्या टिप्स सोशल मीडियावर शेअर करताय? सेबीची नवी नियमावली जारी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 4:18 PM

Sebi Issues Code: शेअर मार्केटविषयी सोशल मीडियावर माहिती शेअर करणाऱ्यांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

Sebi Issues Code: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. तसेच शेअर मार्केटबाबत अनेक जण सोशल मीडियावर माहिती शेअर करत असतात. गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI ने कठोर भूमिका घेतली आहे. शेअर मार्केटविषयी सोशल मीडियावर माहिती शेअर करणाऱ्यांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. 

आता विश्लेषक भ्रामक प्रचार करू शकणार नाहीत. सेबीने गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन विश्लेषकांसाठी एक नवीन जाहिरात कोड जारी केला असून, सर्वांनाच त्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगितले जात आहे. वरील संहिता सल्लागार आणि विश्लेषकांनी किंवा त्यांच्या वतीने जारी केलेल्यांना लागू होते जे गुंतवणूक निर्णयांवर प्रभाव टाकू शकतात, असे म्हटले जात आहे. 

जाहिरात किंवा माहिती देताना डिस्क्लेमर देणे अत्यावश्यक

सेबीच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, शेअर मार्केटबाबतच्या जाहिरातींमध्ये डिस्क्लेमर देणे अत्यावश्यक असेल. "सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.", अशा आशयाचा समावेश असावा, असे सेबीने म्हटले आहे. याशिवाय जाहिरात गुंतवणूकदारांना खात्रीशीर किंवा जोखीम मुक्त परताव्याचे कोणतेही वचन किंवा हमी देणाऱ्या नसाव्यात, असेही सेबीने म्हटले आहे. तसेच सल्लागारांच्या जाहिरातींच्या संहितेमध्ये पारंपारिक चॅनलसह ई-मेल, संदेशन प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, रेडिओ, टेलिफोन किंवा इंटरनेटवरील इतर कोणत्याही स्वरूपासारख्या सर्व इलेक्ट्रॉनिक, वायर्ड किंवा वायरलेस माध्यमांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. 

सेबीने काही शब्दांच्या वापरावरही बंदी घातली

मार्केट नियामक सेबीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलत अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे. यासोबतच सेबीने काही शब्दांच्या वापरावरही बंदी घातली, ज्याबाबत एक परिपत्रक जारी काण्यात आले आहे. सेबीने बंदी घातलेल्या शब्दांची यादी केली आहे. सेबीच्या या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच सेबीनेही जाहिरातीबाबत काही अटी घातल्या आहेत.

दरम्यान, सेबीने सर्व नोंदणीकृत संस्थांनाही या सूचना जारी करत जाहिरातींमध्ये पुरावा म्हणून बनावट वापरकर्त्यांच्या दाव्यावरही बंदी घातली आहे. गृहीतके आणि अनुमानांवर आधारित दावे प्रतिबंधित असतील, असे सांगितले जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक