Venugopal Dhoot : देशात अनेक वर्ष कृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पाहिली जात होती. मात्र, भारतीयांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी पहिल्यांदा स्वदेशी कंपनीने रंगीत टीव्ही बाजारात आणला. एकेकाळी देशातील बहुतांश घरात याच कंपनीचे टिव्ही पाहायला मिळायचे. मात्र, देशात पहिला रंगीत टिव्ही लाँच करणारी कंपनी सध्या संकटात सापडली आहे. होय, आपण व्हिडीओकॉनबद्दल बोलतोय. आर्थिक घोटाळ्यात सापडलेल्या कंपनीचा पाय आता आणखी खोलात गेला आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) व्हिडीओकॉनबाबत मोठी कारवाई केली आहे. सेबीने सुमारे ६८.५ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी वेणुगोपाल धूत आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजची प्रवर्तक संस्था इलेक्ट्रोपार्ट्स (इंडिया) यांची बँक खाती, शेअर्स आणि म्युच्युअल फंड होल्डिंग्स जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी, ३० सप्टेंबर रोजी सेबीने इलेक्ट्रोपार्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजची प्रवर्तक संस्था आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वेणुगोपाल धूत यांना नोटीस पाठवली होती. यामध्ये व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील इनसाइडर ट्रेडिंग अॅक्टिव्हिटीजच्या प्रकरणात त्यांना १५ दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरण्यास सांगण्यात आले आहे.
का झाली कारवाई?सेबीच्या नोटीसीनुसार दंड न भरल्याने धूत आणि इलेक्ट्रोपार्ट्स (इंडिया) विरुद्ध नवीन कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी जारी केलेल्या २ संलग्नक आदेशांमध्ये सेबीने प्रलंबित थकबाकी वसूल करण्यासाठी बँक, डीमॅट खाती आणि वेणुगोपाल धूत आणि इलेक्ट्रोपार्ट्सच्या (इंडिया) म्युच्युअल फंड होल्डिंग्ज जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
कोण आहेत वेणुगोपाल धूत?एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ६१व्या क्रमांकावर असलेले व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्यावर कर्ज फसवणूक प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण, आता त्यांची कंपनी व्हिडिओकॉन दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. भारतात पहिला रंगीत टेलिव्हिजन आणणारा व्हिडिओकॉन आणि त्याचे मालक वेणुगोपाल धूत हे ICICI-Videocon कर्ज फसवणूक प्रकरणात आरोपी आहेत.
वेणुगोपाल यांचे वडील नंदलाल माधवलाल धूत यांनी १९८५ मध्ये व्हिडिओकॉन इंटरनॅशनलची स्थापना केली होती. काही वर्षांत ती ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी वस्तूंमध्ये भारतातील सर्वोच्च कंपनी बनली. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली व्हिडिओकॉनच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली. भारताव्यतिरिक्त, व्हिडिओकॉनने चीन, मेक्सिको, पोलंड आणि इटलीमध्ये उत्पादन प्रकल्प आहेत.