नवी दिल्ली-
ऑनलाइन हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म 'ओयो'चा (OYO) आयपीओ येण्याच्या मार्गात खोडा आला आहे. त्यामुळे ओयोचा आयपीओ येण्यासाठी आता उशीर होण्याची शक्यता आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) ओयो कंपनीला मोठा झटका दिला आहे. सेबीनं ओयोची पॅरेंट कंपनी ओरावेल स्टेज लिमिटेड (Oravel Stays Ltd) कंपनीचा आयपीओचा अर्ज फेटाळून लावला आहे.
आयोच्या आयपीओसाठी पॅरेंट कंपनी ओरावेल स्टेजकडून दाखल करण्यात आलेला अर्ज सेबीनं फेटाळून लावत नव्या अपडेट्ससह पुन्हा अर्ज दाखल करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे कंपनीला आता नव्यानं अर्ज करावा लागणार आहे. याच कारणामुळे ओयोचा आयपीओ येण्यास आता उशीर होणार आहे. ओयोनं आयपीओसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये आपली कागदपत्र सेबीकडे सादर केली होती.
८४३० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लान
ओयोची पॅरेंट कंपनी ओरावेल स्टेज लिमिटेड कंपनीनं सेबीकडे ८४३० कोटी रुपयांचा आयपीओ आणण्यासाठीचा अर्ज दाखल केला होता. या इशू अंतर्गत कंपनीचा प्लान ७ हजार कोटी रुपयांचे नवे शेअर जारी करण्याचा होता तर १४३० कोटी रुपये शेअर्सच्या ऑफर फॉर सेलमधून विक्री करण्याची योजना होती.
३० डिसेंबर रोजी अप्रूव्ह केले गेली कागदपत्र
सेबीच्या वेबसाइटवर ओयोच्या आयपीओ संदर्भातील अपडेट देण्यात आले आहेत. ओयोला आयपीओ अर्ज नव्यानं दाखल करण्यामागचं नेमकं कारण मात्र देण्यात आलेलं नाही. पण ओयोच्या पॅरेंट कंपनीनं दाखल केलेला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस ३० डिसेंबर २०२२ रोजी परत करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
नव्यानं अर्ज दाखल करण्याच्या सूचना
सेबीनं ओयोला अर्ज परत पाठवून नव्या अपडेटसह नव्यानं अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सेबीनं याआधी ओयोला अपडेटेड फायनान्शियल दाखल करण्यास मंजुरी दिली होती. ओयोनं आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या सहा महिन्यातील नफा ६३ कोटी इतका होता. तर गेल्या आर्थिक वर्षातील समान कालावधीसाठी कंपनीला २८० कोटींचा तोटा सहन करावा लागला होता.