बाजार नियामक सेबीने (SEBI) गुरुवारी ‘साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड' नावाच्या कंपनीविरुद्ध यूट्यूब चॅनेलद्वारे (YouTube Channels) शेअरच्या किमतीत फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अंतरिम आदेश जारी केला. देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग फर्म झिरोधाचे संस्थापक नितीन कामथ यांनी सेबीच्या आदेशाचे स्वागत केले आहे. “या आदेशाद्वारे तत्वात न बसणाऱ्या पद्धतींना संपुष्टात आणलं जात आहे,” असं कामथ म्हणाले.
“सोशल मीडिया आणि युट्यूबच्या माध्यमातून आमिष आणि बनावट रिटर्न विकणाऱ्या पंप आणि डंप स्कीमच्या विरोधात सेबीनं जो आदेश जारी केला आहे त्यानं या गोष्टी थांबतील अशी अपेक्षा आहे. शेअर्समध्ये हेराफेरी करणाऱ्यासाठी हा सध्या फसवणुकीचा सर्वात सोपा मार्ग बनला आहे,” असं कामथ यांनी लिहिलं आहे. “या आदेशामुळे अनधिकृतरित्या टीप देणाऱ्या आणि अनधिकृतरित्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सेवा पुरवणाऱ्या काही लोकांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे. असे लोक भारतीय शेअर बाजाराच्या पवित्रतेला नुकसान पोहोचवत आहेत,” असंही ते म्हणाले.
सेबीनं या प्रकरणी ज्या कंपन्यांची ओळख पटवली आहे, त्यात ट्रेडर्स आणि मार्केट ॲनालिसिस्टचाही समावेश आहे. हे युट्यूबच्या ४ चॅनल्सद्वारे शेअर्सचा प्रचार करत होते आणि लोकांना त्यात पैसे गुंतवण्यास प्रोत्साहित करत होते. सेबीला या प्रकरणी वर्षभरापूर्वी एक तक्रार मिळाली होती आणि त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.