भारतीय शेअर बाजारांनी शुक्रवारी, 14 जुलै रोजी नवीन शिखर गाठलं. सेन्सेक्स आणि निफ्टी त्यांच्या आजवरच्या उच्चांकी स्तरावर बंद झाले. सेन्सेक्स पहिल्यांदाच 66,000 चा टप्पा ओलांडून बंद झाला. तर निफ्टी 19,595 च्या नव्या उच्चांकी स्तरावर पोहोचला.
इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या आयटी शेअर्समुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली. बीएसईचा IT निर्देशांक 4.03 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय टेलिकॉम आणि मेटल शेअर्सचे निर्देशांकही 1 टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह बंद झाले. ब्रॉडर मार्केटमध्येही जोरदार खरेदी झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 1 टक्के आणि 1.14 टक्क्यांनी घसरून बंद झाले. या विक्रमी तेजीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे तीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
कामकाजाच्या अखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजारामधील 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 581.13 अंकांनी किंवा 0.89 टक्क्यांनी वाढून 66,140.02 वर बंद झाला. कामकाजादरम्यान सेन्सेक्सनं 66,159.79 अंकांच्या नव्या उच्चांकी स्तराला स्पर्श केला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 150.75 अंकांच्या किंवा 0.78 टक्क्यांच्या वाढीसह 19,564.50 च्या पातळीवर बंद झाला. कामकाजादरम्यान निफ्टीनं 19,595.35 अंकांची विक्रमी उच्चांकी पातळी गाठली.
संपत्ती 2.87 लाख कोटींनी वाढली
बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 14 जुलै रोजी 298.64 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे गुरुवार, 13 जुलै रोजी 295.77 लाख कोटी रुपये होते. दरम्यान, सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.87 लाख कोटी रुपयांनी वाढलं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.87 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.