Join us

सेन्सेक्स पोहोचला ८० हजारांपार, लार्जकॅप खासगी बँका चमकल्या; टाटा कन्झ्युमर टॉप गेनर, टीसीएस घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 4:01 PM

कामकाजाच्या अखेरिस सेन्सेक्स ५४५ अंकांनी वधारून ७९९८७ वर बंद झाला, तर निफ्टी १६३ अंकांनी वधारून २४२८७ च्या पातळीवर बंद झाला.

शेअर बाजारात बुधवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आणि बाजार उघडताच सेन्सेक्सने ८० हजारांचा बहुप्रतीक्षित आकडा ओलांडला. सेन्सेक्स ८००१४ च्या पातळीवर उघडला आणि व्यवहारादरम्यान ८००७४ च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. निफ्टीनेही २४३०७ चा नवा उच्चांक गाठला. कामकाजाच्या अखेरिस सेन्सेक्स ५४५ अंकांनी वधारून ७९९८७ वर बंद झाला, तर निफ्टी १६३ अंकांनी वधारून २४२८७ च्या पातळीवर बंद झाला.

एचडीएफसी बँकेचे शेअर्स ३.४९ टक्क्यांच्या वाढीसह १७९१ च्या पातळीवर उघडले आणि १७९४ या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. उच्चांकी पातळीमुळे एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग दिसून आलं तरी त्याचा परिणाम निर्देशांकांवर झाला नाही. अनेक गुंतवणूकदारांनी इतर लार्जकॅप प्रायव्हेट बँक शेअर्सकडे गर्दी केली. एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वाधिक वधारले.

टॉप गेनर्स

आजच्या बाजारात निफ्टी ५० मध्ये टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. या शेअरमध्ये ३.५० टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. एचडीएफसी बँकेचा सुरुवातीचा नफा मात्र कमी झाला असला तरी शेअर २.२२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. कोटक महिंद्रा बँक, अदानी पोर्ट्स, अॅक्सिस बँक यांचे समभाग प्रत्येकी दोन टक्क्यांनी वधारले. बँकिंग शेअर्सनं आजच्या बाजारावर वर्चस्व गाजवले आणि बँक निफ्टी निर्देशांक संपूर्ण ट्रेडिंग सत्रात ५३००० च्या वर व्यवहार करत होता.

टॉप लूझर्स कोण?

आजच्या बाजारात बहुतांश क्षेत्रांत खरेदी दिसून आली असली तरी निफ्टी ५० निर्देशांकातील काही शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली. आयटी क्षेत्रातून टीसीएसमध्ये १.३० टक्क्यांची घसरण दिसून आली. तर टायटन कंपनीच्या शेअरमध्ये १.२० टक्क्यांची घसरण दिसून आली. टाटा मोटर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्येही वरच्या स्तरावरून विक्रीचा दबाव दिसून आला आणि ते ०.५० टक्क्यांनी घसरले. आजच्या बाजारात सिप्ला आणि डिव्हिस लॅब सारख्या कंपन्यांसह आयटी तसेच फार्मा क्षेत्रातील प्रमुख शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार