भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत भीतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आठवड्याच्या कामाकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 1,093.22 अंकांनी घसरून 58,840.79 अंकांवर खाली आला. तर दुसरीकडे निफ्टीमध्येही 346.55 अंक किंवा 1.94 टक्क्यांची घसरण झाली आली असून तो 17,550 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 285.9 लाख कोटी रुपयांवरून 279.8 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे.
काय आहे कारण?शेअर बाजारात विक्रीच्या वातावरणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेशी संबंधित भीती असल्याचं म्हटलं जात आहे. जागतिक स्तरावर बोलायचे झाल्यास जागतिक बँकेच्या अहवालात 2023 मध्ये जगात पुन्हा आर्थिक मंदी येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच वेळी, देशांतर्गत स्तरावर, फिच रेटिंगने भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजावर कात्री लावली आहे. फिच रेटिंग्सचा ताजा अंदाज आहे की अर्थव्यवस्था 7 टक्क्यांनी वाढेल.
युएस फेडची भीतीअमेरिकन सेंट्रल बँक फेड रिझर्व्हच्या बैठकीबाबत पुन्हा एकदा गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यूएस फेड रिझर्व्ह सलग तिसऱ्यांदा व्याजदर वाढवेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात फेड रिझर्व्हची बैठक होण्याची शक्यता आहे.
हेवीवेट स्टॉक्स घसरलेनिर्देशांकातील हेवीवेट शेअर्सच्या विक्रीमुळेही शेअर बाजारात घसरण झाली आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस, टीसीएस, विप्रोसह सर्व कंपन्यांचे शेअर घसरले. रिलायन्स, एअरटेल सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येदेखील घसरण दिसून आली.