Stock Market Opening Bell: जगातील बहुतांश बाजारांकडून जोरदार संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारातही स्थिती चांगली दिसत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी तब्बल १ ते १ टक्क्यांनी वधारले आहेत. ऑईल अँड गॅस, मेडल आणि वाहन निर्देशांक १-१ टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत, तर निफ्टी आयटी निर्देशांक २ टक्क्यांनी वधारले आहेत.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल चांगला आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ४.४० लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४.४० लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या ८०२.७१ अंकांनी म्हणजेच १.०२ टक्क्यांनी वधारून ७९,६८८.९३ वर आणि निफ्टी ५० २४१.४५ अंकांनी म्हणजे १.०० टक्क्यांनी वधारून २४,३५८.४५ वर आहे. एका दिवसापूर्वी सेन्सेक्स ७८,८८६.२२ वर आणि निफ्टी २४,११७ वर बंद झाला होता.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४.४० लाख कोटींची वाढ
एक दिवसापूर्वी म्हणजेच ८ ऑगस्ट २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप ४,४५,७५,५०७.१२ कोटी रुपये होतं. आज ९ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,५०,१५,६२७.३६ कोटी रुपयांवर पोहोचला. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४,४०,१२०.२४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे सर्व शेअर्स ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून ते सर्व ग्रीन झोनमध्ये आहेत. इन्फोसिस, एचसीएल आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर दुसरीकडे महिंद्रा, पॉवरग्रिड, टीसीएस, टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, एनटीपीसी, टाटा मोटर्स, एल अँड टी, अदानी पोर्ट्स यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.