Sensex-Nifty Jumps: बँक ऑफ जपानच्या आश्वासनाचा जगभरातील बाजारांवर सकारात्मक परिणाम होत आहे. देशांतर्गत बाजारातही खरेदीचा चांगला कल असून देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीनं १-१ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. बँक ऑफ जपानचे डेप्युटी गव्हर्नर यांनी बाजार स्थिर राहिल्यास बँक व्याजदरात वाढ करणार नसल्याचं आश्वासन दिलं. यामुळे निफ्टीच्या सर्वच क्षेत्रांचे निर्देशांक ग्रीन झोनमध्ये असून रियल्टी निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
एकंदरीत आज बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ५.४१ लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५.४१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या ९३०.१३ अंकांनी म्हणजेच १.१८ टक्क्यांनी वधारून ७९,५२३.२० वर आणि निफ्टी ५० २९०.०५ अंकांनी म्हणजेच १.२१ टक्क्यांनी वधारून २४,२८२.६० वर आहे. मंगळवारी सेन्सेक्स ७८,५९३.०७ वर तर निफ्टी २३,९९२.५५ वर बंद झाला होता.
गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली
एक दिवसापूर्वी म्हणजेच ६ ऑगस्ट २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,३९,५९,९५३.५६ कोटी रुपये होतं. आज ७ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,४५,०१,७०८.७५ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात ५,४१,७५५५.१९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे सर्व शेअर्स ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून ते सर्व ग्रीन झोनमध्ये आहेत. इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारुतीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी वाढ झाली आहे. तर जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक, एचसीएल टेक, टाटा स्टील, अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्येही तेजी दिसून आली.