Sensex-Nifty at Record High: अमेरिकन फेडने चार वर्षांनंतर व्याजदरात कपात केल्यानं शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. ऑईल अँड गॅस वगळता निफ्टीच्या सर्व क्षेत्रातील निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत. रियल्टी आणि आयटीचा निफ्टी निर्देशांक १-१ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल चांगला आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप ३.०९ लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.०९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या ४६०.५८ अंकांनी म्हणजेच ०.५६ टक्क्यांनी वधारून ८३,४०८.८१ वर आणि निफ्टी ५० १६०.३५ अंकांनी म्हणजेच ०.४९ टक्क्यांनी वधारून २५,५०१.६० वर उघडला. यापूर्वी बुधवारी सेन्सेक्स ८२,९४८.२३ वर आणि निफ्टी २५,३७७.५५ वर बंद झाला होता.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.०९ लाख कोटींची वाढ
एक दिवस आधी म्हणजे १८ सप्टेंबर रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप ४,६७,७२,९४७.३२ कोटी रुपये होतं. आज १९ सप्टेंबर रोजी बाजार उघडताच ते ४,७०,८२,८२७.८४ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३,०९,८८०.५२ कोटी रुपयांची वाढ झाली.
सेन्सेक्सचे २९ शेअर ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी २९ शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. एनटीपीसी, टेक महिंद्रा आणि टीसीएस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढझ झाली. दुसरीकडे एअरटेलच्या शेअरमध्ये मात्र आज घसरण झाली.