Stock Market Closing On 16 July 2024: मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला, तर निफ्टीच्या मिडकॅप निर्देशांकानंही नवा उच्चांक गाठण्यात यश मिळवलं. पण वरच्या पातळीवरून बाजारात नफावसुली दिसून आली, त्यामुळे बाजार विक्रमी पातळीवरून घसरून किरकोळ तेजीसह बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात मिडकॅप शेअर्समधील विक्रीमुळे निफ्टीचा मिडकॅप निर्देशांकही घसरला.
बाजारात घसरण झाली असली तरी आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी दिसून आल्यानं बाजारात थोडी तेजी राहिली. आजच्या व्यवहाराच्या अखेरीस बीएसई सेन्सेक्स ५२ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८०,७१६ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २६ अंकांच्या वाढीसह २४,६१३ अंकांवर बंद झाला.
मार्केट कॅप फ्लॅट बंद
बाजार फ्लॅट बंद झाल्यानं बीएसईवरील लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅपही फ्लॅट बंद झालं. बीएसईचं मार्केट कॅप आजच्या व्यवहारात ४५५.२० लाख कोटी रुपयांवर बंद झालं, जे मागील सत्रात ४५५.०६ लाख कोटी रुपये होतं. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १४००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
कोणत्या शेअर्समध्ये तेजी / घसरण?
आजच्या व्यवहारात एचयूएल २.४९ टक्के, भारती एअरटेल १.७६ टक्के, टेक महिंद्रा १.१७ टक्के, इन्फोसिस १.०७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.८४ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.७२ टक्के, आयटीसी ०.६८ टक्के, एशियन पेंट्स ०.५६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर, कोटक महिंद्रा बँक २.०७ टक्के, रिलायन्स १.३७ टक्के, एनटीपीसी १.३४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट १.२३ टक्के, टाटा मोटर्स ०.४३ टक्क्यांनी घसरले.