Join us  

ऑटो-FMCG आणि मिडकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 4:06 PM

Share Markets Closing: बेंचमार्क निर्देशांक जवळपास २ महिन्यांतील त्यांच्या नीचांकी पातळीवर घसरताना दिसला. सेन्सेक्स जवळपास ५०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह बंद झाला.

Share Markets Closing: गुंतवणुकदारांनी केलेल्या विक्रीमुळे गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बजाज ऑटोसह इतर ऑटो शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे ही त्सुनामी आली आहे. याशिवाय एफएमसीजी आणि बँकिंग शेअर्समध्येही जोरदार विक्री दिसून आली. भारतीय शेअर बाजारासाठी हा सलग तिसरा आठवडा चढ-उताराने जात आहे. बाजारात अस्थिरता आहे. बेंचमार्क निर्देशांक जवळपास २ महिन्यांतील त्यांच्या नीचांकी पातळीवर घसरताना दिसले. सेन्सेक्स जवळपास ५०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह बंद झाला.

या शेअर्समध्ये चढउतारसेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी ९ शेअर्स वाढीसह आणि २१ शेअर्स तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ९ शेअर्स वर तर ४१ खाली होते. वाढत्या शेअर्समध्ये इन्फोसिस २.८४ टक्के, टेक महिंद्रा २.८१ टक्के, पॉवर ग्रिड १.२१ टक्के, एसबीआय ०.७३ टक्के, रिलायन्स ०.१९ टक्क्यांनी वाढले. घसरलेल्या शेअर्समध्ये बजाज ऑटो १३.११ टक्के, श्रीराम फायनान्स ४.११ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ३.५२ टक्के, नेस्ले ३.४४ टक्के, हिरो मोटोकॉर्प ३.३९ टक्के घसरले.

गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसानभारतीय शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुरुवारच्या सत्रात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४५७.२६ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात ४६३.२९ लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बजाज शेअर्स का पडले?कंपनीने बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. दुसऱ्या तिमाहीत कंपनीची आर्थिक कामगिरी खूपच खराब होती. त्यांच्या निव्वळ नफ्यात ३१ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. या घसरणीनंतर दुसऱ्या तिमाहीत बजाज ऑटोचा निव्वळ नफा १३८५ कोटी रुपयांवर घसरला. २०२३-२४ या आर्थिक वर्षात बजाज ऑटोचा निव्वळ नफा २०२० कोटी रुपये होता. कंपनीचा एकूण परिचालन महसूल दुसऱ्या तिमाहीत १३,२४७ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत १०,८३८ कोटी रुपये होता. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक