Join us

शेअर बाजार घसरण्यामागील ३ कारणे समोर; सेन्सेक्स ५०० अंकांनी खाली, 'हे' १० शेअर्स खलनायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:54 IST

Stock Market : गेल्या दीड महिन्यापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. यामागची कारणे आता समोर आली आहेत.

Stock Market : शेअर बाजारात दररोज घसरण होत आहे. आजही सेन्सेक्स आणि निफ्टी दबावाखाली व्यवहार करताना दिसत आहेत. पण स्मॉल कॅप आणि मिडकॅप इंडेक्सचे बहुतांश शेअर्स वधारत आहेत. ही घसरण हेवीवेट स्टॉकमधील दबावामुळे अधिक आहे. जी गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठी भीती आहे. आज सेन्सेक्स २८८ अंकांनी घसरला होता, तर निफ्टी ८८ अंकांनी घसरला होता. दरम्यान, या घसरणीमागची ३ मोठी कारणे आता समोर आली आहेत.

सेन्सेक्स सध्या ३५५ अंकांनी घसरून ८१,३९३.११ वर व्यापार करत आहे, तर निफ्टी ११० अंकांनी घसरून २४,५५८.९५ वर आहे. बँक निफ्टी १९० अंकांनी घसरून ५३,३९१.८० वर आहे. BSE सेन्सेक्सच्या टॉप ३० शेअर्सपैकी २२ समभाग घसरले आहेत, तर उर्वरित ६ समभागांमध्ये वाढ होत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सर्वाधिक १ टक्क्यांची घसरण झाली. त्याचवेळी, NSE वर निफ्टी ५० चे ३४ शेअर्स घसरत आहेत, ज्यात श्रीराम फायनान्स, रिलायन्स आणि भारती एअरटेल सारख्या हेवीवेट समभागांचा समावेश आहे.

'या' १० शेअर्समध्ये मोठी घसरण ब्लू स्टार, भारत डायनॅमिक, श्रीराम फायनान्सचे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. पिडीलाइट, एल अँड टी फायनान्स, मॅक्स फायनान्स सर्व्हिसेस, रेमंड आणि आयटीआयच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आहे. याशिवाय ग्रासिम इंडस्ट्रीज, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वेदांत यांचे शेअर्सही १ टक्क्यांनी घसरले.

शेअर बाजार रोज का कोसळतोय? या आठवड्याच्या अखेरीस फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर आणि महागाईबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध पावलं टाकत आहेत. दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत. याशिवाय भारत VIX मध्ये देखील वाढ दिसून येत आहे. या सर्व कारणांमुळे शेअर बाजारात घसरण होत आहे.

बाजारात गती कधी परतणार? हेवीवेट शेअर्सच्या घसरणीचे मुख्य कारण तिमाही निकाल असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, या घसरणीला लवकरच ब्रेक लागण्याची शक्यता आहे. चांगले जागतिक संकेत आणि फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर भारतीय शेअर बाजारातही तेजी येऊ शकते. सध्या गुंतवणूकदारांनी संयम राखण्याची गरज आहे.

डिस्क्लेमर : यामध्ये शेअर बाजाराविषयी माहिती देण्यात आली आहे. लोकमत कोणताही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकअमेरिका