Closing Bell Today : बुधवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 34 अंकांच्या घसरणीसह 72152 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1 अंकाच्या वाढीसह 21930 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभरात शेअर बाजाराच्या कामकाजात बरेच चढ-उतार दिसून आले. निफ्टीनं बुधवारी 21660 ते 22053 अंकांच्या पातळीदरम्यान कामकाज केलं. निफ्टीच्या कामकाजात 29 शेअर्समध्ये तेजी तर 21 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
हे शेअर्स घसरले
बुधवारी शेअर बाजाराच्या कामकाजात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. टेक महिंद्रा आणि इन्फोसिस या आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि विप्रोचे शेअर्सही शेअर बाजारातील टॉप लूजर्सच्या यादीत समाविष्ट होते.
या शेअर्समध्ये तेजी
कामकाजादरम्यान एसबीआय, सन फार्मा, कोल इंडिया, अदानी एंटरप्रायझेस, मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर दुसरीकडे कामकाजादरम्यान निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात वाढ झाली तर, निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली.
अदानींच्या कंपन्यांमध्ये तेजी
बुधवारी शेअर बाजाराच्या व्यवहारादरम्यान, गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी 8 लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सनं वाढ नोंदवली, तर एसीसी लिमिटेड आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स किंचित घसरणीसह बंद झाले. शेअर बाजारात मुथूट फायनान्स, एसबीआय कार्ड, ॲक्सिस बँक, पतंजली फूड्स, बजाज फायनान्स, फेडरल बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती सुझुकी यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.